नागपूर: केंद्र सरकार बँकांची फसवणूक टाळण्यासाठी विविध पावले उचलल्याचा दावा करते. परंतु मागील चार वर्षांत देशातील बँकांची १ लाख १० हजार ९२३.७५ कोटींनी फसवणूक झाली आहे. त्यापैकी केवळ ५ हजार ४८.२८४३ कोटींचीच (४.५५ टक्के) वसुली झाली. त्यामुळे देशातील विविध बँकांमध्ये सामान्यांनी ठेवलेला पैसा सुरक्षीत आहे काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आर्थिक क्षेत्रात वेगाने होणारे डिजिटायझेशन, सायबर हल्ले, बनावट कागदपत्राद्वारे कर्जाची उचल, या मार्गांनी बँकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) केंद्रीय जन सुरक्षा अधिकारी नेगनेईकिम गुईटे यांनी माहिती अधिकारात दिलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२१-२२ ते २०२४-२५ पर्यंत देशातील विविध बँकांची ६ लाख ९३ हजार १२४ प्रकरणात १ लाख १० हजार ९२३.७५ कोटींनी फसवणूक करण्यात आली. त्यापैकी ५ हजार ४८.२८ कोटींचीच वसुली झाली. २०२१-२२ या आर्थिक वर्षात बँकांची ४४ हजार ३४७.०८ कोटींनी फसवणूक झाली. त्यानंतर पुढील दोन वर्षे फसवणुकीची रक्कम निम्म्याहून कमी होती. परंतु २०२४-२५ मध्ये पुन्हा ३४ हजार ६०९.१९ कोटी रुपयांनी बँकांची फसवणूक झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले आहे. फसवणुकीच्या तुलनेत वसुली अत्यल्प असल्याने सरकार या वसुलीसाठी ठोस पाऊल कधी उचलणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बँक फसवणूक म्हणजे काय?
बँक फसवणूक हा आर्थिक गुन्ह्याचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये वैयक्तिक फायद्यासाठी किंवा इतर गुन्हेगारी कृत्यांसाठी वित्तीय संस्था किंवा तिच्या सेवांचा गैरवापर केला जातो. त्यात खोटे खाते तयार करणे, खोटी ओळख वापरणे किंवा खात्याच्या नोंदींमध्ये फेरफार करणे यासारख्या विविध तंत्रांचा समावेश असू शकतो. यामध्ये चोरीचे क्रेडिट कार्ड , एटीएम कार्ड किंवा वित्तीय संस्थेच्या निधीमध्ये अनधिकृत प्रवेशाचे इतर प्रकार वापरणे देखील समाविष्ट असू शकते. बँक फसवणूक हा एक गंभीर गुन्हा आहे.
बँकांच्या फसवणुकीची स्थिती
स्त्रोत- रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून माहिती अधिकारात दिलेली आकडेवारी.
…………………………………………………………………………………………..
आर्थिक वर्ष — प्रकरणे — फसवणूक (कोटीत) — वसूल रक्कम (कोटीत)
…………………………………………………………………………………………..
२०२१- २२ — ७७,५५१ — ४३,३४७.०८ — ४६३.७७०८
२०२२- २३ — ९६,२८७ — १९,८८४.८३ — १,०९०.१३
२०२३- २४ — ३,४६,०४९ — १३,०८२.६५ — ७५२.८२९५
२-२४- २५ — १,७३,२३७ — ३४,६०९.१९ — २,७४१.५५४