नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तारखेनुसार शतक महोत्सव २७ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. याप्रसंगी नागपूरच्या वेरायटी चौकातील गांधी पुतळ्यासमोरून स्वयंसेवकांनी पथसंचलन केले. यावेळी खुद्द सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते.महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी काँग्रेस तसेच इतर पक्षांनी काढलेली संविधान बचाव मशाल यात्रा पोहचली. यावेळी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी स्वतः उपस्थित होते.
मोहन भागवत यांच्याकडून पथ संचालनाचे अवलोकन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला तारखेनुसार शनिवार २७ सप्टेंबरला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त तीन पथसंचलनांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्यांदाच तीन स्थानांवरून एकाचवेळी ही पथसंचलने सुरू होईल आणि याचे एकत्रीकरण व्हरायटी चौक येथे झाले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचे संघावर अनेकदा आरोप झाले आहेत. मात्र शताब्दी वर्षात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर पथसंचलनांचे अवलोकन केले. या पथसंचलनामध्ये हजारो गणवेशधारी स्वयंसेवकांचा सहभाग होता. व्यक्त करण्यात आला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक अशा विजयादशमी उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. यावर्षीच्या सोहळ्याला संघ परिवारातील विविध संस्थांच्या प्रमुखांसह तब्बल पंधरा हजारांवर गणवेशधारी स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत. याशिवाय संघाने विविध देशांच्या आंतरराष्ट्रीय दुतावासांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. पहिले पथसंचलन कस्तुरचंद पार्क, दुसरे यशवंत स्टेडियम आणि तिसरे अमरावती महामार्गावरील हॉकी मैदान येथून सुरू झाला. संचलन क्रमांक एकचा मार्ग कस्तुरचंद पार्क, संविधान चौक, झिरो माइल, व्हरायटी चौक, महाजन मार्केट, हॉटेल गणराज, टेकडी हनुमान मंदिर मार्ग, झीरो माइल, संविधान चौक, कस्तुरचंद पार्क असा असेल. यामध्ये मोहिते, लालगंज, बिनाकी, सदर भागातील स्वयंसेवक असतील. संचलन क्रमांक दोनचा मार्ग यशवंत स्टेडियम, मुंजे चौक, व्हरायटी चौक, झाशी राणी चौक, पंचशील चौक, जनता चौक, हम्पयार्डटी पॉइंट, धंतोली पोलिस स्टेशन चौक, मेहाडिया चौक, यशवंत स्टेडियम असा असून यामध्ये इतवारी, अजनी, अयोध्यानगर, नंदनवन भागातील स्वयंसेवकांचा समावेश होता. संचलन क्रमांक तीनचा मार्ग अमरावतील मार्गावरील हॉकी मैदान, व्हरायटी चौक, फ्रीडम पार्क चौक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, भारतीय हॉकी मैदान असा असून यात धरमपेठ, त्रिमूर्तीनगर, सोमलवाडा, गिट्टीखदान भागातील स्वयंसेवक होते.
काय म्हणाले तुषार गांधी?
महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यावर तुषार गांधी यांनी संघाच्या पथ संचालनावर थेट विधान केले. ते म्हणाले, हे काळाचे दुर्दैव आहे की महात्मा गांधी यांचे हत्यारे काल त्यांच्याकडे आले होते. आज त्यांचे अनुयायी आले आहेत. काल आणि आज मध्ये हाच मुख्य फरक आहे. आपल्याला हा फरक जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार अभिजित वंजारी, आमदार विकास ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येत काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.