नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष आहे. २ ऑक्टोबरला संघाचा विजयादशमी सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती, नागपूरद्वारे नव्‍या संगीताचा साज चढलेल्‍या संघगीत संग्रहाचे लोकार्पण सोहळा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या शुभहस्ते रविवारी पार पडला.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वीय सहाय्यक संघ गीतांचा संग्रह करणारे कुणाल जोशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना गडकरी यांनी सांगितले की, कुणाल जोशी हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेऊन आले. तेथे त्यांनी टॉपचे शिक्षण घेतले आहे. माझ्यासोबत काम करण्यासाठी ते आले असता, माझ्यासोबत काम करून सरकारमध्ये तुझे भविष्य खराब होईल, असे सांगितले होते. मात्र, त्यांनी काम करण्याची जिद्द करून अखेर संघ गितांचे काम केले असेही गडकरी म्हणाले.

गडकरी पुढे म्हणाले, शंकर महादेवन यांनी संघ गीतांना उत्तम प्रकारे स्वरबद्ध केले आहे. त्यांना हृदयातून हात जोडून धन्यवाद देतो. मी या कामात निमित्त मात्र आहे. जीवनात जे काही चांगले शिकायला मिळाले ते संघ आणि त्यामधील गीतांमधून. संघामध्ये असताना बौद्धीक होत होते. त्यावेळी ऐकलेल्या गीतांमधून डोळ्यात पाणी येत होते. शब्द आणि संगीतात किती ताकद आहे हे सर्वांना माहिती आहे. अनेक समर्पिक स्वयंसेवकांच्या जीवनात गीत तयार झाले आहेत. संघामध्ये गीत तयार झालेल्यांचे नाव कधीच पुढे येत नाही. संघाच्या गीतांवर पीएच.डी. झाली आहे. ज्येष्ठ प्रचारक आणि स्वयंसेवकांच्या मुखातून पुढे येणाऱ्या संघ गीतांमधून आम्ही भाव समजण्याचे काम केले. शंकर महादेवन यांची गाणी ऐकल्यावरही आमचे मन अतृत्प आहे. शरद केळकर आणि शंकर महादेवन यांचे नागपूरमध्ये ५० हजार लोकांसमोर संघ गीतांचा कार्यक्रम नक्की केला जाईल. संघ गीतांच्या शब्दामध्ये मोठी ताकद आहे. शंकर महादेवन यांच्या गायणाने संघ गीतांना अमर केले.

आगामी खासदार सांस्कृतिक महोत्सवात संपूर्ण संघगीत संग्रहातिल २५ गाणी गाण्यासाठी शंकर महादेवन यांना तसेच सूत्र संचालन करण्यासाठी निमंत्रण देत असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. यावेळी त्यांनी प्रेरणादायी संघ गीतांच्या आठवणीना उजाळा दिला. ‘शत नमन माधव चरण’ हे संघ बौद्धिक ऐकलेले गीत कायम स्मरणात राहिले असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले. शब्दसुरांच्या ताकदीने संघ भाव या गीतांनी थेट मनापर्यंत पोहोचतो आणि त्याचा आपल्या व्यक्तित्वावर सकारात्मक परिणाम होतो असे गडकरी यावे म्हणाले.