नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ स्वयंसेवक भैय्याजी जोशी यांनी काही महिन्यांपूर्वी केलेल्या एका वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला होता. “मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. जसे की मुंबईतील घाटकोपर भागाची भाषा गुजराती आहे”, असं वक्तव्य जोशी यांनी केले होते. त्यानंतर भैय्याजी जोशी यांनी दिवाळीच्या निमित्त आयोजित एका कार्यक्रमात भारताने इस्राईलकडून शिकावे असे वक्तव्य केले. याशिवाय धर्मांतरावर महत्त्वाची भूमिका मांडली. त्यामुळे भैय्याजी जोशी नेमके काय म्हणाले ते पाहूया.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांनी देशाची सुरक्षितता आणि सांस्कृतिक अस्तित्वाच्या मुद्यांवर संघ मुख्यालयात झालेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमात मोठे भाष्य केले आहे. त्यांनी इस्रायलचे उदाहरण देत, भारताने आपल्या आंतर्गत आणि बाह्य सुरक्षा आव्हानांचा समर्थपणे सामना करणे आवश्यकता असल्याचे मत व्यवक्त केले आहे. यावेळी त्यांनी धर्मांतरणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. धर्मांतरणाच्या वाढत्या प्रकारांवर तीव्र चिंता व्यक्त करत जोशी यांनी, धर्मांतरणावर संपूर्ण बंदी घालायला हवी, असे आवाहन केले आहे. तसेच, समाजातील प्रत्येक घटकाने या दिशेने संकल्प करण्याची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले.

नेमके काय म्हणाले जोशी?

भैयाजी म्हणाले, “अंतर्गत आणि बाह्य संकटांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी भारताने ‘स्वावलंबी, सशक्त आणि सजग’ राष्ट्र बनेणे आवश्यक आहे. आज जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे आणि परदेशातील भारतीय नागरिकही देशाच्या संस्कृतीमुळे अभिमानास्पद अनुभव घेत आहेत.

…तरच समाजाचा समग्र आणि संतुलित विकास साधता येईल

स्वातंत्र्याचे महत्त्व सांगत भाय्याजी म्हणाले, आपण स्वतंत्र भारतात जन्म घेतला हे आपले भाग्य आहे आणि या स्वातंत्र्याचे पावित्र्य राखणे ही सामूहिक जबाबदारी आहे. तसेच, देशाचा विकास केवळ भौतिक प्रगती किंवा पायाभूत सुविधांच्या बांधणीपुरताच मर्यादित नाही, तर मानसिक, सांस्कृतिक आणि रचनात्मक बांधणी यावरही भर देणे गरजेचे आहे, तरच समाजाचा समग्र आणि संतुलित विकास साधता येईल.

कोण आहेत जोशी?

जोशी यांनी सरकार्यवाह म्हणून संघटनात्मक नियोजन, धोरणात्मक निर्णय, संघाशी संबंधित संघटनांमधील समन्वय साधण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. संघाचे विचार गावागावांत पोहोचवण्यासाठी त्यांनी काम केलं. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटवण्यासाठीचं आंदोलन, राम जन्मभूमी आंदोलन आणि इतर अनेक सामाजिक उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला आहे.