नागपूर: काँग्रेस राजवटीत पंतप्रधानपदी इंदिरा गांधी असतांना लागलेल्या आणीबाणीवर (इमरजेंसी) सत्ताधारी भाजपकडून एकही टिका करण्याची संधी सोडली जात नाही. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आणीबाणीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाद्वारे कारागृहातील प्रार्थनेबाबत एक किस्सा सांगितला.

संघ प्रार्थना ध्वनिचित्रफीत लोकार्पण सोहळा शनिवारी नागपुरातील डॉ. हेडगेवार स्मृती भवन, रेशीमबाग येथे संपन्न झाला. त्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मोहन भागवत पुढे म्हणाले, संघाची प्रार्थना हा संघाचा सामूहिक संकल्प आहे. स्वयंसेवक रोज त्याची आठवण करतात. व्यक्तिगत संकल्प स्वयंसेवकाच्या व्यक्तिगत प्रतिज्ञात तर आम्ही सर्व मिळून काय करायचे ठरवले ते संघाच्या प्रार्थनेत आहे. प्रार्थनेमध्ये ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमी… आणि शेवट ‘भारत माता की जय..’ आहे. त्यात पहिला नमस्कार भारत मातेला आणि नंतर ईश्वराला नमस्कार आहे.

प्रार्थनेत भारत मातेला काहीही मागितले नाही. फक्त तिच्या करता जे द्यायचं त्याचा उच्चार आहे. जे मागायचे ते परमेश्वराला मागितले आहे. १९३९ पासून आज पर्यंत स्वयंसेवक रोज शाखेवर प्रार्थना म्हणतात. इतक्या वर्षाच्या या साधनेतून या प्रार्थनेला मंत्राचा सामर्थ्य लाभले आहे. प्रार्थनेमुळे स्वयंसेवक पक्का कसा होतो ते रोज प्रार्थना करणाऱ्या स्वयंसेवकाला माहित आहे. त्यामुळे ही प्रार्थना करण्याची धडपड स्वयंसेवकात दिसते. आणीबाणीमध्ये पुष्कळ लोकांचा पोलिसांनी पकडले. त्यात काही संघ शाखेतील नियमित तर काही अनियमितही होते. नियमित असलेल्यापैकी एक पॅरोलवर बाहेर आला होता. मी तिथे संघ प्रचारक असल्याने त्याला जाऊन भेटलो. त्यांना काळजीच काही कारण नव्हते. त्यांनी मला सांगितले हल्ली रोज शाखेत जायला मिळत नव्हते. परंतु कारागृहात रोज प्रार्थना करायला मिळते. ही प्रार्थना लोकांपर्यंत पोहचावी म्हणून आजचा उपक्रम असल्याचेही मोहन भागवत यांनी सांगितले.

प्रार्थनेचा पहिला रूप भाव, त्यातून शब्द ठरुन अर्थ…

प्रार्थनेचा पहिला रूप हा भाव आहे. नंतर शब्द ठरले, त्यातून अर्थ निघाला आणि मग त्या अर्थातून पुन्हा भाव स्पष्ट झाला. सुरुवातीला मराठी आणि हिंदी प्रार्थना होत्या. पण अखिल भारतात चालणारी भाषा संस्कृत असल्याने प्रार्थनेची संस्कृत रचना करण्याचा विचार झाला. त्या वेळी चर्चा झाली की आपण मराठी- हिंदी प्रार्थना कोणत्या भावाने करतो. तो भाव शब्दबद्ध करण्याची आवश्यकता होती. यासाठी भिडे मास्तरांकडे निरोप गेला. भिडे मास्तर हे संघाचे स्वयंसेवक आणि संस्कृत पंडित होते. त्यांनी त्या भावाला शब्दबद्ध केले आणि त्यामुळे प्रार्थना संस्कृतमध्ये रचली गेल्याचेही भागवत म्हणाले. पश्चिम बंगालचे उदाहरन सांगत त्यांनी प्रार्थना ही मने जोडणारी असल्याचे सांगितले.