अकोला : १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूच्या धाकावर अत्याचार प्रकरणाने अकोला शहर हादरले असून सकल हिंदू समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो लोकांनी सहभाग घेऊन प्रकरणाचा निषेध केला. विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहे.

शहरातील डाबकी रोड परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर नराधमाने चाकूच्या धाकावर अत्याचार केला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणामुळे शहरात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. पीडित मुलीला न्याय देऊन आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने मोर्चा काढून जनआक्रोष व्यक्त केला.

शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्ववर मंदिरातून मोर्चाला प्रारंभ झाला. शहराच्या प्रमुख मार्गावर मार्गक्रमण करून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. याठिकाणी मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर झाले. मोर्चात खासदार अनुप धोत्रे, अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांची पदाधिकारी प्रामुख्याने सहभागी झाले होते.

संग्राम जगताप यांनी मोर्चाला संबोधित केले. प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले होते. सकल हिंदू समाज एकत्र आल्याने पोलिसांनी आरोपीला परराज्यात अटक केली. ही सकल हिंदू समाजाची ताकद आहे. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, असे संग्राम जगताप म्हणाले. ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा लागू झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

भिन्नधर्मीय आरोपींकडून आतापर्यंत विविध जिल्ह्यांमध्ये अल्पवयीन मुली, तरुणीवर अत्याचार झाले आहेत. गृह विभागाने ‘लव्ह जिहाद’च्या तक्रारींची नोंद केली असून त्यात वर्ष २००८ ते २०११ या ४ वर्षात २२ तक्रारी झाल्याचे म्हटले आहे. यात अकोला जिल्ह्यातील तक्रारीचा देखील उल्लेख आहे. ही संख्या किती तरी अधिक असल्याचे निवेदनात म्हटले. अत्याचाराचे प्रकरण जलद‌गती न्यायालयात चालवावे, नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, आरोपीचे घर उद्ध्वस्त करावे, आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाज किंवा धर्मगुरूंनाही सहआरोपी म्हणून गुन्हे दाखल करावेत, पीडित मुलीसह तिच्या कुटुंबाला तातडीने २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन कायदेशीर मार्गदर्शन आणि पोलीस संरक्षण देण्यात यावे, महाराष्ट्र‌मध्ये अल्पवयीन मुलींच्या संरक्षणासाठी उत्तर प्रदेश सरकारने लागू केलेल्या ‘लव्ह जिहाद’ काय‌द्याप्रमाणे कठोर कायदा त्वरित लागू करावा व दोषींना जन्मठेपेची किंवा फाशीची तरतूद करावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन कारवाई करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.