यवतमाळ : मे. रिलायन्स रिटेल लिमिटेड कंपनीच्या येथील ‘रिलायन्स मार्ट’ या किराणा व गृहपयोगी वस्तू विक्रीच्या मॉलमध्ये जाळे लागलेले आणि भुंग्यांनी पोखरलेले शेंगदाणे तसेच भुंगे असलेले काबुली चणे ग्राहकांना विकण्यात येत असल्याची गंभीर बाब अन्न व औषध प्रशासन विभागाने अचानकपणे केलेल्या तपासणीतून पुढे आली आहे.

शहरातील महादेव मंदीर मार्गावर असलेल्या रिलायन्स मार्टमध्ये बुधवारी सायंकाळी अचानक भेट देवून तपासणी केली. यावेळी कुजलेले आणि बुरशी व कीड लागलेले जिन्नस येथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आढळले. याबाबत येथील अधिकारी, कर्मचारी समाधानकारक खुलासा देऊ शकले नाही. त्यामुळे शेंगदाणे चनासाठा जप्त करण्यात आला.

हेही वाचा – चंद्रपूर : ज्युनियर कॉलेज शिक्षकांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली; शिक्षक संघटना पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

रिलायन्स मार्ट स्टोअरमध्ये स्थानिक अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही धाडसी कारवाई केली. यावेळी विक्रीकरीता ठेवण्यात आलेले गुड लाईफ आणि प्रो नेचर या दोन ब्रँडचे पाकीटबंद शेंगदाणे पूर्णपणे खराब झालेले आढळून आले. दोन्ही ब्रँन्डचे एक-एक पाकीट उघडून पाहिले असता त्यामध्ये कुजलेले शेंगदाणे आणि कीटकाची जाळी, जळमटे मोठ्या प्रमाणात आढळून आली. तसेच कीटकांनी अर्धवट कुरतडलेल्या दाण्यांची संख्याही मोठी होती. त्यामुळे प्रत्येक ब्रँन्डचे ४-४ पाकीट नमुन्याकरीता घेण्यात येवून उर्वरीत साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर स्टीलच्या कोठीमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेले खुले शेंगदाणे पाहिले असता त्यात मोठ्या प्रमाणात किड्यांची जाळी लागलेली दिसून आली.

काही दाणे किड्यांनी कुरतडलेले आणि भुंगा लागलेले आढळले. त्यापैकी दोन किलो शेंगदाणे नमुन्याकरीता घेवून उर्वरीत साठा जप्त करण्यात आला. स्टीलच्या कोठीमध्ये विक्रीसाठी ठेवलेले काबुली चणे तपासले असता त्यात मोठ्या प्रमाणात भुंग्यांची छिद्रे आढळली व त्यात जिवंत किडे फिरत असलेले आढळले. त्यापैकी दोन किलो चणे नमुन्याकरीता घेवून उर्वरीत साठा जप्त करण्यात आला.

हेही वाचा – आर्थिक शिस्त बिघडल्याची शिक्षण विभागास उपरती; ‘वन हेड, वन वाउचर’ योजना राबविणार

अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी जी. पी. दंदे व गोपाल माहोरे यांनी त्यांच्या पथकासह ही कारवाई केली. रिलायन्स मार्टसारख्या मोठ्या आस्थापणेवर करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई असल्याने अयोग्य अन्न पदार्थ विक्रीकरीता ठेवणाऱ्या आस्थापणा चालकांचे धाबे दणाणले आहेत. अशा प्रकारची तपासणी मोहीम संपूर्ण जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने अनपेक्षितपणे राबविण्यात येणार असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथील रिलायन्स मार्टमधील व्यवस्थेबाबत अनेक ग्राहकांच्या तक्रारी होत्या. येथे ग्राहकांना चोरसारखी तपासणी करून वागणूक दिल्या जात असल्याबाबत ग्राहकांमध्ये असंतोष होता.