नागपूर : अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान गुरुवारी दुपारच्या सुमारास कोसळून भीषण अपघात झाला. एअर इंडियाच्या बोइंग ७८७ या प्रवासी विमानातून क्रू मेंबर्ससह २४४ प्रवासी प्रवास करत होते. हे विमान उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच मेघानी परिसरात कोसळले होते. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही या अपघातात मृत्यू झाला. रुपाणी त्यांच्या पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते. दरम्यान, भारतात यापूर्वी देखील झालेल्या विमान अपघातात अनेक राजकीय नेत्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आतापर्यंत सात नेत्याचा अकाली मृत्यू विमान अपघातात झाला आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांना १९८० मध्ये विमान अपघातात निधन झाले होते. संजय गांधी यांनी २३ जून १९८० रोजी पहाटे हवाई स्टंट करताना विमानावरील नियंत्रण गमावले होते. त्यानंतर संजय गांधी यांचे विमान नवी दिल्लीच्या डिप्लोमॅटिक एन्क्लेव्हमध्ये कोसळले होते. या विमान अपघातात संजय गांधी यांच्यासह कॅप्टन सुभाष सक्सेना यांचाही मृत्यू झाला होता.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नागरी विमान वाहतूक मंत्री माधवराव सिंधिया यांचे ३० सप्टेंबर २००१ रोजी कानपूर येथे एका रॅलीदरम्यान विमान अपघातात निधन झाले होते. माधवराव सिंधिया हे दहा आसनी खाजगी विमानातून प्रवास करत होते. मात्र उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे खराब हवामानाचा फटका त्यांच्या विमानाला बसला आणि त्यातच माधवराव सिंधिया यांचा मृत्यू झाला होता.
लोकसभेचे अध्यक्ष आणि तेलगू देसम पक्षाचे नेते जीएमसी बालयोगी यांचे ३ मार्च २००२ रोजी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील भीमावरम येथून येणारे एक खाजगी हेलिकॉप्टर आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कैकलूरजवळील तलावात कोसळले होते. या अपघातात जीएमसी बालयोगी यांचा मृत्यू झाला होता.
मेघालयाचे ग्रामीण विकास मंत्री सायप्रियन संगमा यांचे २२ सप्टेंबर २००४ रोजी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. ते गुवाहाटीहून शिलाँगला पवन हंस या हेलिकॉप्टरने जात होते आणि त्यांच्यासोबत नऊ जण होते. त्यांचे हेलिकॉप्टर गुवाहाटी राज्याच्या राजधानीपासून फक्त २० किमी अंतरावर असलेल्या बारापाणी तलावाजवळ कोसळले होते.
हरियाणाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री ओम प्रकाश जिंदाल यांचे २००५ मध्ये एका हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. त्यांच्यासोबत मंत्री सुरेंद्र सिंह होते. दोन्ही नेते हेलिकॉप्टरने दिल्लीहून चंदीगडला जात होते. मात्र उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले आणि या अपघातात ओम प्रकाश जिंदाल आणि सुरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाला होता.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे ३० एप्रिल २०११ मध्ये एका हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. दोरजी खांडू हे इतर चार जणांसोबत तवांगहून इटानगरला जात होते. त्यांचे हेलिकॉप्टर राज्याच्या पश्चिम कामेंग जिल्ह्यात कोसळले होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचे २ सप्टेंबर २००९ मध्ये एका हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. वायएस राजशेखर रेड्डी हे त्यांच्या बेल ४३० हेलिकॉप्टरमध्ये उड्डाण करत होते. त्यांचे हेलिकॉप्टर नल्लामालाच्या जंगलात कोसळले होते.