नागपूर : भारतात लोकशाही असल्याने राजकीय मतभेद, सत्तेसाठी स्पर्धा, परस्परांवर टीका होणारच. मात्र, सत्ताप्राप्तीसाठी टीका करताना जनतेमध्ये विसंवाद निर्माण होणार नाही आणि देशाच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही, याचा विवेक राजकीय पक्षांनी बाळगावा, असा सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी दिला. रेशीमबाग मैदानावर आयोजित तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप समारंभात ते बोलत होते.

सुमारे पाऊण तासाच्या भाषणात भागवत यांनी विविध मुद्यांना स्पर्श केला. जागतिक आर्थिक संकटात तसेच करोनावर मात करताना भारताने उत्तम कामगिरी करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. जी-२० परिषदेचे अध्यक्षपद आणि नव्या संसद भवनामुळे सर्वसामान्य गौरवान्वित झाले आहेत. या सुखावणाऱ्या बाबी असल्या तरी भाषा, पंथ, संप्रदाय आणि सवलतीच्या मुद्यांवरून देशात हिंसा करणे अयोग्य असल्याचे सरसंघचालक म्हणाले. भारतात राहणाऱ्यांचे पूर्वज एकच होते. जे बाहेरून आले ते परत गेले. आता येथे कोणीही बाहेरचा नाही. आपण सर्व एकच आहोत आणि भारत हीच आपली मातृभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदूवी स्वराज हीच संघाच्या हिंदू राष्ट्राची संकल्पना आहे, असेही भागवत यांनी नमूद केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सिद्धगिरी संस्थान मठ, कणेरी (जि. कोल्हापूर) येथील अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शत्रूराष्ट्रे भारताच्या उणिवा शोधत असताना त्यांना एकजुटीची ताकद दाखविण्याचे सोडून आपण आपसात संघर्ष करीत आहोत. आपल्यातील काहीजण त्यास प्रोत्साहन देत आहेत. देशाची एकता आणि अखंडता अबाधित राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान द्यायला हवे. -मोहन भागवत, सरसंघचालक