यवतमाळ : राज्यातील संवेदनाहीन सरकार शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे डोळेझाक करत असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘सातबारा कोरा कोरा’ यात्रेला मनसेने जाहीर पाठिंबा दिला आहे, तसेच आगामी मुंबई मोर्चाची सर्वस्वी जबाबदारीही स्वीकारली आहे.
मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर हे स्वतः पायी चालत यात्रेत दाखल झाले आणि शेतकऱ्यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. हे सरकार केवळ जाहिरातबाजी करते, प्रत्यक्ष काम काहीच करत नाही. या आंदोलनाचा पुढचा टप्पा ठरणाऱ्या मुंबई मोर्चासाठी मनसेने खुले निमंत्रण दिले असून सर्व कार्यकर्ते, शेतकरी व जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जर सरकारला जागं करायचं असेल, तर लाखोंच्या गर्दीत मुंबईत उतरावं लागेल.
मनसे या लढ्यासाठी पूर्ण सज्ज आहे, असे बाळा नांदगावकर म्हणाले. शेतकरी आत्महत्या करत आहे, कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे, आणि सरकार मात्र जल्लोषात नाचत आहे, अशी टीका नांदगावकर यांनी केली. मनसे नेते राज ठाकरे यांची भूमिका यावर ठाम आहे. राजकारण बाजूला ठेवा, आधी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवा असेही ते सरकारला उद्देशून म्हणाले. मनसेच्या मते, हा मोर्चा केवळ निदर्शने नाही, तर राज्य सरकारच्या अपयशी धोरणांना हादरवणारी जनलाट ठरणार आहे. शेतकरी, कामगार, महिला आणि युवकांचा असंतोष आता शिगेला पोहोचला असून, सरकारच्या नियंत्रणाबाहेर परिस्थिती जाण्याची चिन्हं दिसत आहेत, असेही बाळा नांदगावकर म्हणाले. सातबारा कोरा करा, अन्यथा सरकार कोसळेल, असा इशारा या सभेत मान्यवरांनी दिला. यावेळी असंख्य शेतकरी उपस्थित होते.
‘बच्चूभाऊ विरोधकांसाठी कडू, पण न्यायासाठी गोड!’
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू भाऊ कडू हे विरोधकांसाठी जरी कडू वाटत असले तरी न्यायाच्या लढ्यात ते शेतकऱ्यांसाठी गोड आहेत, असे विधान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे. ‘सातबारा कोरा कोरा’ यात्रेदरम्यान बच्चू भाऊंच्या कार्याला त्यांनी खुला पाठिंबा दिला असून, हा लढा केवळ राजकीय नाही तर शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे, असे ते म्हणाले.