अमरावती : उद्यापासून तीन दिवस खगोलीय घटनांची रेलचेल राहील. यामध्ये विलोभनीय कडी असणारा शनी ग्रह हा २१ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या जवळ राहील. तर, ग्रहमालेतील शेवटचा नेपच्यून ग्रह येत्या २३ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ येणार आहे.
या घटनांना खगोलशास्त्रात ‘प्रतियुती’ म्हणतात. नेहमीच दिवस व रात्र यांचा कालावधी असमान असतो. मात्र सोमवारी २२ सप्टेंबरला हा कालावधी प्रत्येकी १२ तासांचा राहील. या दिवशी दोन्ही गोलार्ध पृथ्वीपासून समान अंतरावर राहणार असल्याचे खगोल तज्ज्ञांनी सांगितले.
शनी पृथ्वीजवळ..
शनी ग्रह २१ सप्टेंबरला पृथ्वीच्या जवळ येणार आहे. प्रतियुतीच्या आसपास शनी व पृथ्वी यांचे सरासरी अंतर कमी असते. त्यामुळे या काळात शनीची सुंदर कडी चांगल्या प्रकारे दिसू शकते. तथापि ही कडी साध्या डोळ्यांनी नव्हे तर दुर्बिणीने पाहावी लागणार आहे. शनीला एकूण ८२ चंद्र आहेत, यामध्ये सर्वांत मोठा चंद्र टायटन आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालायला २९.५ वर्षे लागतात. या ग्रहाची घनता सर्वांत कमी आहे. पृथ्वी ज्यावेळी शनीच्या विषववृत्त पातळीत असते, अशावेळी शनीचे कडे पृथ्वीवरून चांगल्या प्रकारे दिसू शकत नाही.
दिवस रात्र समान
पृथ्वीवर दर वर्षाला २१ मार्च व २२ सप्टेंबर या दिवशी दिवस व रात्र प्रत्येकी १२ तासांचे म्हणजेच समान असतात. या विशेष तारखांना खगोल शास्त्रात विषुवदिन म्हणतात. इतर वेळी दिवस व रात्र नेहमीच लहान-मोठे असतात. दिवस व रात्रीची असमानता ही पृथ्वीच्या आसाच्या कलन्यामुळे निर्माण होते.
पृथ्वीच्या परिवलनाचा अक्ष तिच्या परिभ्रमण कक्षेच्या प्रतलाच्या संदर्भात सुमारे २३.६ अंशाने वळलेला आहे. त्यामुळे तिचा उत्तर वा दक्षिण गोलार्ध सूर्याकडे कमी-अधिक झुकलेला राहतो. यामुळे पृथ्वीवरील दिवस-रात्री लहान वा मोठ्या होतात. ऋतु उद्भवतात. तसेच सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन घडते. वर्षांतून दोनदा २२ डिसेंबर व २१ जून महिन्यात, अशी स्थिती येते.
नेपच्यून पृथ्वीजवळ
नेपच्यून ग्रह येत्या २३ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ येणार आहे. याला खगोलीय भाषेत प्रतियुती असे म्हणतात. एवढेच नव्हे तर हा ग्रह सूर्याच्याही जवळ येणार आहे. प्रतियुतीदरम्यान ग्रहांचे अंतर पृथ्वीपासून नेहमीच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे खगोल शास्त्रज्ञांना या ग्रहांचे निरीक्षक योग्यप्रकारे करता येते. सूर्याला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी नेपच्यून ग्रहाला १६५ वर्षे लागतात. तसेच हा ग्रह १६ तासात स्वत:भोवती प्रदक्षिणा पूर्ण करतो.