नागपूर : कोराडीत प्रस्तावित वीज प्रकल्प होऊ नये म्हणून सर्व पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी एकत्र येत विविध समाजमाध्यमांवरून ‘सेव्ह नागपूर-स्टॉप कोराडी एक्सपान्शन’ ही मोहीम सुरू केली आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमधून एक संदेश फलक तयार करण्यात आला आहे.
राज्यातील कोळशावर आधारित वीज प्रकल्प बंद करण्यात येत असून कोराडी येथे मात्र ६६० मेगावॅटचे दोन वीज प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. कोराडीत आधीच वीज प्रकल्प असताना आणखी दोन प्रकल्प आणून नागपूरकरांना प्रदूषणाच्या खाईत लोटले जात आहे. महाराष्ट्रातील ७१ टक्के औष्णिक ऊर्जा विदर्भात तयार होते, पण केवळ ११ टक्के वीज विदर्भात वापरली जाते. एकटा पुणे विभाग महाराष्ट्रातील ३० टक्के वीज वापरतो, पण पुणेकर एकही वीज प्रकल्प तिकडे उभारू देत नाहीत. आताही नवीन वीज प्रकल्प कोराडी येथे होत आहे. याठिकाणी २६०९ मेगावॅट औष्णिक वीज केंद्रात ६६० मेगावॅटचे आणखी दोन संच उभारण्याची तयारी सुरू आहे. या प्रकल्पासाठी २९ मे रोजी जनसुनावणी होणार आहे.

कोराडी परिसरात आधीच औष्णिक वीज केंद्र कार्यरत असून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आणि वाढलेल्या तापमानाची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे महाजनकोने प्रस्तावित दोन संच कोराडीत स्थापन करू नये, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. २९ मे रोजी आयोजित जनसुनावणीलादेखील पर्यावरणवाद्यांनी विरोध केला आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून ‘सेव्ह नागपूर-स्टॉप कोराडी एक्सपान्शन’ ही मोहीम सुरू करण्यात आल्याचे पर्यावरणवाद्यांनी सांगितले.