नागपूर : मेडिकल रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून ५०० रुपये शुल्कापोटी घेत मेडिकलच्या नोंदीत केवळ १२० रुपये दाखवले गेले. या प्रकरणात सोमवारी सुमारे १२ कर्मचाऱ्यांची चौकशी प्रशासनाद्वारे नियुक्त समितीकडून केली गेली. मेडिकलमध्ये बीपीएल रुग्णांवर मोफत, इतरांवर कमी दरात उपचार होतात. गैरबीपीएल रुग्णांना चाचण्या, खाटा व इतर सेवांचे शुल्क भरावे लागते. रुग्णांच्या सुटीच्या कार्डावर ५०० रुपये भरायचा शेरा असल्यास रुग्णांकडून पाचशे रुपये आकारले जातात.

येथे कर्मचाऱ्यांनी घोटाळ्याची नवीन क्लृप्ती योजली. त्यानुसार रुग्णाला पाचशे रुपयांची पावती दिली, परंतु मेडिकलच्या नोंदीत केवळ १२० रुपये नोंदले गेले. मेडिकलला हा प्रकार गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असल्याचा प्रशासनाला संशय आहे. येथे एका रुग्णाच्या बाबतीत हा प्रकार पुढे आल्यावर अधिकाऱ्यांना तो कळला. त्याने प्रशासनाचे धाबे दणाणले. या रुग्णाने शल्यक्रिया विभागात उपचार घेतले होते. अधिकाऱ्यांच्या निरीक्षणात ऑनलाईन पद्धतीने त्याच्या दोन पावत्या तयार झाल्याचे पुढे आले. ५७० रुपयांच्या पावती क्रमांकावर लिपिकाने ऑफिस कॉपी असलेल्या पावतीमध्ये केवळ १२० दाखवले आणि मेडिकलच्या खात्यामध्ये ते जमा केले.

हेही वाचा >>> गॅस्ट्रोची साथ! उमरखेड तालुक्यात २०० पेक्षा जास्त रुग्ण आढळले

एका रुग्णांकडून ४५० रुपये या कर्मचाऱ्याने चोरी करून ते खिशात घातले. दुसऱ्यांदा उपचारासाठी आल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने बघितले असता, १२० रुपयांची नोंद होती. तर रुग्णाच्या पावतीवर ५७० रुपये अदा केले होते, हा प्रकार एका तिसऱ्या कर्मचाऱ्याच्या निदर्शनात आल्यावर हा प्रकार पुढे आला. दरम्यान येथे बीपीएल रुग्णांवर मोफत एमआरआय होते. त्यामुळे सामान्य रुग्णांकडून पैसे आकारून त्यांना बीपीएल दाखवून हेही पैसे आरोपी कर्मचाऱ्यांनी लुटले काय? याबाबतही समितीकडून चौकशी सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधिष्ठात्यांकडून गंभीर दखल

मेडिकलमधील शुल्क घोटाळ्याची गंभीर दखल अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी घेतली आहे. त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार, डॉ. मोहमद फैजल, डॉ. मनीष ठाकरे, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख यांचा समावेश असलेल्या चौकशी समितीकडून चौकशीही सुरू केली. समितीकडून १२ कर्मचाऱ्यांची चौकशी केली गेली. हे कर्मचारी मेडिकलच्या खिडकी क्रमांक ६६ मध्ये वा जवळपास कार्यरत होते.