नागपूर : नेपाळमध्ये जाऊन नोकरी करीत पैसे कमवावे आणि आईवडिलांना द्यावे, असा विचार करुन एका शाळकरी मुलीने घर सोडले. ती थेट नेपाळला पोहचली आणि भरकटली. मात्र, दहा दिवसांत कळमना पोलिसांनी नेपाळमधून शोधून पालकांच्या स्वाधीन केले. घरून निघून गेल्यानंतर ती मुलगी एका महिलेच्या हाती सापडली. तिने तिला स्वत:च्या घरी नेले. तेथून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. कळमना पोलिसांच्या या पाठपुराव्याबद्दल पोलीस वर्तुळात त्यांचे कौतुक होत आहे.
कळमना हद्दीत राहणाऱ्या ४१ वर्षाच्या महिलेची १५ वर्षाची अल्पवयीन मुलगी २ मे रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घरून शिकवणीला जाते, असे सांगून घरून निघून गेली. रात्र झाली तरी घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, पण सापडली नाही. शेवटी अज्ञात आरोपीने फूस लावून पळवून नेल्याच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी कलम १३७ (२) भान्यासं अन्वये गुन्हा दाखल करून शोध सुरू केला.
गुन्ह्याचे गांभिर्य पाहून तपासात कळमना पोलिसांनी त्वरीत दखल घेतली आणि तांत्रिक तपास करून मुलीचा शोध घेतला. ती रेल्वेने तिरोडी, मध्यप्रदेश येथे गेल्याचे समजले. पोलिसांनी तेथे जावून परिसरातील सीसीटिव्हीचे फुटेज चेक केले असता मुलगी तेथून पटना रेल्वेस्टेशन व तेथून बसने बिट्टामोर, नेपाळ बॉर्डर येथे गेल्याचे दिसले. कळमना पोलिसांनी तेथे जाऊन मुलीचे फोटो दाखवून शोध घेतला असता ती मुलगी सीतामढी बसने गेल्याचे समजले. पोलिसांनी तेथे जावून शोध घेतला असता ती जनकपूर, नेपाळ येथील महिला देवी विनोद पाठक यांच्याकडे सुखरूप सापडली.
पोलिसांनी मुलीची विचारपूस केली असता तिने वडिलांचा जॉब गेल्याने, घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने तसेच परिस्थिती सुधारण्याकरीता पैसे कमविण्यासाठी नेपाळ येथे आल्याचे सांगितले.
मुलगी नेपाळमध्ये सुरक्षित
ज्या महिलेकडे ही मुलगी सापडली त्या देवी पाठक यांना पोलिसांनी विचारले असता त्यांनी ती मुलगी सितामढी बसमध्ये एकटी दिसल्याने विचारपूस केली असता ती घरून पळून आल्याचे समजले. ती भरकटू नये म्हणून तिला सोबत आणल्याचे सांगितले. पोलिसांनी मुलीच्या घरी संपर्क संपर्क केला. मुलीचे समूपदेशन केले. तिला जनकपूर, नेपाळ येथून सुखरूप आणून तिच्या पालकांचे ताब्यात दिले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त (परिमंडळ क्रमांक ५) निकेतन कदम, सहा. पोलीस आयुक्त (नवीन कामठी विभाग) विशाल क्षीरसागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्ता घुगल, संजय राठोड, नायक पोलीस अंमलदार उमरबेग मिर्झा यांनी पार पाडली.