अमरावती : शाळाबाह्य कामांमुळे आधीच त्रस्‍त असलेल्‍या शिक्षकांसमोर आणखी एक नवीन संकट उभे ठाकले असून ‘मुख्‍यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमाअंतर्गत शासकीय आणि खाजगी व्‍यवस्‍थापनाच्‍या शाळांमधील विद्यार्थ्‍यांना येत्‍या २५ फेब्रुवारीपर्यंत मुख्‍यमंत्र्यांच्‍या संदेश पत्रासोबत विद्यार्थी आणि पालकांचा सेल्‍फी संकेतस्‍थळावर अपलोड करण्‍याची सक्‍ती करण्‍यात आल्‍याने शालेय शिक्षण प्रभावित झाल्‍याचा आक्षेप पालक आणि शिक्षकांनी नोंदविला आहे.

शिक्षण आयुक्‍तालयाच्‍या परिपत्रकानुसार ‘मुख्‍यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानात विद्यार्थ्‍यांना स्‍वहस्‍ताक्षरातील शैक्षणिक घोषवाक्‍य अपलोड करावे लागणार आहे. याशिवाय पालक आणि विद्यार्थ्‍यांना मुख्‍यमंत्र्यांच्‍या संदेशपत्रासोबतच सेल्‍फी संकेतस्‍थळावर अपलोड करायचा आहे. या दोन स्‍वतंत्र उपक्रमात सहभागी विद्यार्थ्‍यांमधून प्रत्‍येक जिल्‍ह्यातून प्रथम क्रमांकावरील पात्र विद्यार्थ्‍याला रोख बक्षीस तसेच त्‍याला आणि त्‍याच्‍या कुटुंबातील अन्‍य तीन सदस्‍य व वर्गशिक्षक यांना मुख्‍यमंत्र्यांसमवेत मुंबई येथे स्‍नेहभोजन कार्यक्रमाची संधी मिळणार आहे. याशिवाय विद्यार्थ्‍यांना वाचन सवय प्रतिज्ञा घ्‍यावी लागणार आहे.या तीन उपक्रमांच्‍या माध्‍यमातून गिनिज बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्डमध्‍ये नोंद करण्‍यासाठी शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांवर सक्‍ती करण्‍यात आल्‍याने शाळांमधील दैनंदिन कामकाज विस्‍कळीत झाल्‍याची ओरड सुरू झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संबंधित संकेतस्‍थळावर उपक्रमाची चित्रफित शाळांना अपलोड करावी लागणार आहे. विद्यार्थी आणि शिक्षक या कामात गुंतल्‍याने ऐन परीक्षेच्‍या गडबडीत शैक्षणिक कामकाजावर परिणाम झाल्‍याचे पालकांचे म्‍हणणे आहे.