यवतमाळ : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय, अर्थात जिल्हा परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट आरक्षणाची सोडत जाहीर झाली. या सोडतीमुळे, अनेक महिन्यांपासून ‘गुडघ्याला बाशिंग बांधून’बसलेल्या असंख्य इच्छुकांचा हिरमोड झाला आहे, तर काही नवीन लोकांना राजकारणात अनपेक्षित लॉटरी लागणार आहे. एकूण ६२ जागांपैकी ३१ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने, जिल्हा परिषदेत महिलांना ५० टक्के प्रतिनिधित्व मिळणार आहे. मात्र मुख्य पक्षांकडे संबंधित प्रवर्गात योग्य महिला उमेदवार नसल्याने, सर्वत्रच ही शोधाशोध सुरू झाली आहे.

या आरक्षणामुळे जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाची समीकरणे बदलणार असली तरी, मिनी मंत्रालयात पुरुषसत्ताक राजकारणाला ब्रेक लागेल का, हा प्रश्नच आहे.

जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या उपस्थितीतईश्‍वरचिठ्ठी पद्धतीने आरक्षण निश्‍चित करण्यासाठी मितांश योगेश ढोरे या लहान मुलाला पाचारण करण्यात आले होते. त्याने काढलेल्या चिठ्ठ्यांवरून जिल्ह्यातील एकूण ६२ जिल्हा परिषद गटांचे आरक्षण निश्‍चित करण्यात आले. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले. या आरक्षणामुळे अनेक विद्यमान सदस्य आणि प्रबळ दावेदारांचे गट आरक्षित झाल्याने त्यांना आता नव्या गटाचा शोध घ्यावा लागणार आहे, किंवा आपल्या कुटुंबातील महिला सदस्याला पुढे करावे लागणार आहे. यामुळे अनेक ठिकाणी राजकीय अस्वस्थता निर्माण झाली असून, इच्छुकांनी आतापासूनच आपल्या सोयीच्या गटासाठी चाचपणी सुरू केली आहे.

असे आहे आरक्षण…

बाभूळगाव तालुका: घारफळ-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, सावर-अनुसूचित जाती. कळंब तालुका: कोठा- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नांझा- अनुसूचित जमाती, डोंगरखर्डा-अनुसूचित जमाती. राळेगाव तालुका: जळका-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, झाडगाव-अनुसूचित जमाती-महिला, खैरी-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-महिला. मारेगाव तालुका: कुंभा-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-महिला, मारेगाव-वेगाव- अनुसूचित जमाती-महिला. वणी तालुका: राजूर-सर्वसाधारण, वेल्हाळ( वसाहत)-सर्वसाधारण, तरोडा-सर्वसाधारण, वागदरा-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, शिरपूर-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला). झरी-जामणी तालुका: माथार्जुन-अनुसूचित जमाती-(महिला), मुकुटबन-सर्वसाधारण. केळापूर तालुका: मोहदा-अनुसूचित जमाती (महिला), सायखेडा (अनुसूचित जमाती-महिला), पहापळ-अनुसूचित जमाती, पाटणबोरी-अनुसूचित जमाती. घाटंजी तालुका: खापरी-अनुसूचित जमाती, पारवा-अनुसूचित जमाती, पार्डी (नस्करी) अनुसूचित जमाती (महिला).

यवतमाळ तालुका: भारी-अनुसूचित जमाती(महिला), आकपूरी-सर्वसाधारण (महिला), अकोला बाजार- अनुसूचित जमाती (महिला), रुई-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग. नेर तालुका: पाथ्रड गोळे-अनुसूचित जाती, मांगलादेवी-सर्वसाधारण(महिला), बाणगाव -सर्वसाधारण (महिला). दारव्हा तालुका: बोरी खुर्द-सर्वसाधारण, लाडखेड-सर्वसाधारण(महिला), लोही-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), भांडेगाव-सर्वसाधारण (महिला), महागाव (कसबा)-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग. आर्णी तालुका: जवळा-सर्वसाधारण महिला, बोरगाव (दा.)-सर्वसाधारण (महिला), सुकळी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, सावळी (स.)-सर्वसाधारण.

दिग्रस तालुका: आरंभी-साखरा-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), कलगाव-डेहणी-सर्वसाधारण, हरसूल-शिंगद-सर्वसाधारण. पुसद तालुका: बान्सी-सर्वसाधारण (महिला), मधुकरनगर-नागरिकांचा मागावर्ग प्रवर्ग (महिला), जामबाजार-सर्वसाधारण, रोहडा-सर्वसाधारण (महिला), श्रीरामपूर- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-महिला), काकडदाती-अनुसूचित जाती (महिला),शिळोना-सर्वसाधारण, शेंबाळपिंपरी-अनुसूचित जाती (महिला). महागाव तालुका: काळी (दौ.)-नागरिकांचा मागासगर्व प्रवर्ग (महिला), हिवरा-सर्वसाधारण (महिला), गुंज-सर्वसाधारण (महिला), सवना-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), फुलसावंगी-सर्वसाधारण, काळी (दौलत)-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, फुलसावंगी-सर्वसाधारण. उमरखेड तालुका: निंगणूर-सर्वसाधारण, पोफाळी-सर्वसाधारण, बिटरगाव (बु.)-सर्वसाधारण (महिला), ब्राम्हणगाव-अनुसूचित जाती, मुळावा-अनुसूचित जाती (महिला), विडूळ- अनुसूचित जाती (महिला).