अनिल कांबळे, लोकसत्ता

नागपूर: शहरात ‘सेक्स रॅकेट’चा सुळसुळाट झाला असून ब्युटीपार्लर, मसाज सेंटर, स्पेशल स्पा, पंचकर्म आणि युनिसेक्स सलून अशा गोंडस नावाखाली बिनबोभाट देहव्यापार सुरू आहे. अनेक रॅकेटकडून पोलीस लाच घेत असल्याची माहिती आहे. गुन्हे शाखेने गेल्या पाच महिन्यांत केवळ १० छापे घातले.

मालिका, चित्रपटात लहान-सहान भूमिका करणाऱ्या अभिनेत्री, जाहिरातीच्या मॉडेल्स, भोजपुरी-तामिळ-दाक्षिणात्य चित्रपटांशी संबंधित तरुणी, बार डान्सर यांच्याशी देहव्यापारात सक्रिय दलाल काही दिवसांचा करार करतात. त्यांना शहरातील मोठमोठे हॉटेल्स किंवा फार्महाऊसवर ठेवून तेथे देहव्यापार केला जातो.

हेही वाचा… महापारेषण कंपनीत लवकरच बंपर भरती

काही दलाल रशिया, श्रीलंका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूटान येथील तरुणींना करारबद्ध करून नागपुरात आणतात. याबाबत माहिती असूनही गुन्हे शाखा शांत आहे. या पथकाने गेल्या पाच महिन्यांत १० ठिकाणी छापे घालून १३ मुलींना ताब्यात घेतले व १७ दलालांना अटक केली. बेलतरोडी, हुडकेश्वर, सदर, अंबाझरी, सीताबर्डी आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत देहव्यापाराचे सर्वाधिक अड्डे आहेत.

विशेष व्यवस्था

नागपुरात सर्वाधिक देहव्यापार ब्युटी पार्लरच्या नावावर चालतो. अनेक दलाल ब्युटी पार्लरच्या संचालकांशी करार करतात. तेथे देहव्यापार करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येते. काही तरुणी ब्युटी पार्लरमध्ये नोकरी करीत असल्याचे दाखवण्यात येते. परंतु, त्यांना आंबटशौकीन ग्राहकांच्या स्वाधीन केले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अल्पवयीन मुलींच्या आयुष्याशी खेळ

अनेक ग्राहक अल्पवयीन मुलींची मागणी करतात. त्यासाठी मोठी रक्कम खर्च करण्याची तयारी दर्शवतात. त्यामुळे महिला दलाल अल्पवयीन-शाळकरी मुलींना देहव्यापाराच्या दलदलीत ओढतात. मुलींना महागडे कपडे, मेकअप साहित्य आणि पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारात ओढले जाते.