नागपूर: रुग्णालय म्हटले तर वेदनांनी ग्रासलेले रुग्ण, त्यांच्यावर ताण- तणावात उपचार करणारे डॉक्टर- परिचारिकांसह आरोग्य कर्मचारी हे चित्र डोळ्यापुढे निर्माण होते. नागपुरातील शालिनीताई मेघे हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने वयोवृद्ध आणि मानसिक तानतनावातील रुग्णांवर उपचाराची  भन्नाट कल्पना पुढे आणली आहे. या संवर्गातील रुग्ण येथे औषधोपचारासह गाणे गाऊन- एकूण उपचार घेत आहे. या अनोख्या थेरपीचा रुग्णांवर सकारात्मक परिणामही होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.

नागपुरातील वानाडोंगरी येथील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजशी संलग्न असलेले १,०२० रुग्णशय्येचे मल्टी-सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटल, शालिनीताई मेघे हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने त्यांच्या ज्येष्ठ नागरिक, पॅलियटिव्ह केअर आणि डी- ॲडिक्शन विभागांमध्ये संगीत थेरपीची सुरूवात करून रुग्ण- केंद्रित आणि संपूर्ण आरोग्य सेवा उपक्रमाला नवीन मार्ग दिला आहे.

‘मानस – सिंगिंग क्लब’ या नव्या उपक्रमाद्वारे रुग्णांना संगीताच्या माध्यमातून भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक आधार मिळत आहे. या उपक्रमात रुग्ण स्वत:ही विशिष्ट भागात गाणे गाऊ शकतो. तर रुग्णांसाठी येथे डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी वेगवेगळ्या गितांची मेजवानी देतात. हे गाणे कमी आवाजात अधून- मधून गाले- एकले जाते.

रुग्णालयातील मानसिक आरोग्य विभागाच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन डीएमआयएचईआर(डीयू) ऑफ-कॅम्पसचे संचालक डॉ. अनुप मारार यांनी केले. यावेळी डॉ. अभिजीत फाये, डॉ. प्रियांका बोधारे, डॉ. प्रीतम चांडक, डॉ. अपूर्वा जोशी, डॉ. अतीबा अहमद, डॉ. सुरभि बोरकर, डॉ. सीमा सिंग, डॉ. सोनिया खत्री, ब्रदर नीरज कालिहारी आणि सिस्टर विशाखा उपस्थित होते.

मानसिक आरोग्य विभागाचे प्राध्यापक व प्रमुख डॉ. पी. पाटील म्हणाले, संगीत थेरपीमुळे रुग्णाची चिंता, नैराश्य आणि दीर्घकालीन वेदना कमी करून जीवनमान सुधारण्यास मदत होते. तर ज्येष्ठ नागरिक आणि पॅलियटिव्ह केअर रुग्णांमध्ये आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. या थेरपीचा येथील रुग्णांवर सकारात्मक परिणामही होतांना दिसत आहे. डॉ. अभिजीत फाये म्हणाले, संगीत थेरपी रुग्णांना भावनिक व्यक्त होण्याचा मार्ग उपलब्ध करून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये संवाद अधिक मजबूत करण्यास मदत करते.

संचालक डॉ. अनुप मरार काय म्हणतात…

रुग्णालयात सुरू झालेली संगीत थेरपी एक प्रभावी पद्धत आहे. संगीत, गाणे, लय, आणि स्वरांच्या माध्यमातून शरीर, मन आणि भावनांचा समतोल साधला जातो. गाण्यामुळे ताण, चिंता आणि उदासीनता कमी होऊन मन शांत होते आणि आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारून या थेरपीचा रुग्णांना लाभ होत असल्याची माहिती डीएमआयएचईआर(डीयू) ऑफ-कॅम्पसचे संचालक डॉ. अनुप मारार यांनी दिली.