वर्धा : राजकीय पक्षांचे चिन्ह ही एक पक्षीय ओळख असते. निवडणूक काळात या चिन्हाचे बटण दाबून मतदान करण्याचे आवाहन केल्या जाते. म्हणून ओळख निर्माण करण्याचे आव्हान नेत्यांपुढे राहते. महाराष्ट्रात झालेल्या पक्षफुटीने नवे चिन्ह मैदानात आले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी हे चिन्ह मिळाले. मात्र या वस्तूची विदर्भात वेगळी ओळख आहे.
बैलाला हाकण्यासाठी तुतारी उपयोगात येते, एका काडीला दाभणीसारखी अणकुचीदार सळी बांधून ती तयार होते. ती टोचली की बैल सुसाट धावतो. त्यामुळे तुतारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये म्हणून तुतारी न म्हणता तुतारी वाजविणारा मनुष्य, असे लिहणे सुरू झाले. वर्ध्यातील आघाडीच्या उमेदवारास हे चिन्ह मिळाले आणि धांदल उडाली होती.
हेही वाचा…ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, सिरोंचातील मतदान केंद्रावर गोंधळ; अहेरीवरून हेलिकॉप्टरने अर्ध्या तासात…
म्हणून उमेदवार अमर काळे समर्थकांनी १०० तुताऱ्या जुळविल्या. आता त्या वाजविणार कोण व कुठे असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर लग्न समारंभात तुतारी वाजविणारे शोधण्यात आले. ते पण चढ्या दराने तयार झाले. आता चिन्ह सर्वत्र जाण्यासाठी पदयात्रा काढल्या जात असून त्यात अग्रभागी तुतारी वादक तुतारी फुंकत असल्याचे मजेशीर दृष्य बघायला मिळत आहे.