बुलढाणा : आषाढी एकादशीच्या निमित्ताने जे भाविक श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाऊ न शकले नाहीत ते भाविक विदर्भातील प्रति पंढरी म्हणून विख्यात असलेल्या श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथे दर्शन घेण्यासाठी येत असतात. भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री संस्थानच्या वतीने शनिवार, ५ जुलै रोजी श्रींचे मंदिर रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे.
रविवार आषाढी एकादशी निमित्त, मराठवाडा, जळगाव खान्देश, विदर्भातील विविध जिल्ह्यांतील हजारो भाविक श्रींच्या समाधी दर्शनासाठी येतात. यामुळे होणारी मोठी गर्दी, दर्शनासाठी लागणाऱ्या दीर्घ रांगा, भाविकांची गैरसोय लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
आषाढी एकादशी निमित्त श्रींच्या मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये काकडा भजन, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ व श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा होणार आहे, रात्री ८ ते १० वाजेदरम्यान कीर्तन होणार आहे.
५ जुलैच्या रात्री आणि ६ जुलैला दिवसभर मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेता येईल. दर्शनबारी व श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, पारायण व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भक्तांच्या सोयीसाठी संस्थानच्या भक्त निवासामध्ये नियमानुसार अल्पदरात राहण्याची व्यवस्था नित्याप्रमाणे सुरू आहे. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी श्रींचे सेवेकरी आपली सेवा देण्यास तत्पर आहेत.