नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन महायुती मधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत असताना शिंदे सेनेचा पुन्हा एक मंत्री अडचणीत येताना दिसून येत आहे. शिंदे सेनेचे एकामागून एक मंत्री अडचणीत येत असल्याने महायुतीमध्ये तणाव निर्माण झाल्याचे सांगण्यात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीच्या वाऱ्या करत आहे. तर त्यांचा पुन्हा एका मंत्राचा प्रताप समोर आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्टंटचे ‘ प्रताप ’ करून रॅपिडोची स्पॉन्सरशिप मिळवल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात कांग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स वर पोस्ट केली आहे.
स्टंटचे ‘ प्रताप ’ करून मिळवली रॅपिडोची स्पॉन्सरशिप…

परिवहन मंत्र्यांचे अभिनंदन केले पाहिजे, की त्यांनी आपल्या इव्हेंटसाठी पैसे कसे उभे करायचे याचा डेमो महाराष्ट्र सरकारला दाखवला.आधी एका खासगी अॅपवरून बाईक बुक करायची मग गरीब बिचाऱ्या बाईकवाल्याला पकडायचे, अॅपवरून बाईक चालवणे नियमबाह्य आहे असा स्टंट करायचा, त्याचे व्हिडिओ बनवून परिवहन मंत्री किती स्मार्ट आणि अलर्ट आहेत असा पीआर करायचा, स्वतःची इमेज बिल्डिंग करायची…

आणि मग अडचणीत आलेल्या या खासगी अॅपवाल्यांकडून इव्हेंटसाठी निधी मिळवायचा, किती छान आयडिया आहे ना, महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट असताना निधी कसा उभा करायचा, याचा आदर्शच प्रतापी मंत्र्यांनी घालून दिला.

इव्हेंटसाठी पैसे उभे करायचे असेल तर मंत्र्यांना काय काय करावे लागते आहे. राज्याची आर्थिक स्थिती पाहता येणाऱ्या काळात विविध खात्यातील मंत्र्यांना देखील अशीच स्टंटबाजी करावी लागेल, असं चित्र आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.