बुलढाणा : राज्यातील मतदार याद्यातील घोळ आणि मतचोरी कडे निवडणूक आयोग व राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शनिवारी मुंबईत मोर्चा काढला. या मोर्च्याच्या धामधूमीत शिवसेना (उबाठा गट) च्या राज्य प्रवक्त्या अडव्होकेट जयश्री शेळके यांनी ठाकरे सेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.
यावेळी शेळके यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यातील घोळ आणि गत विधानसभा निवडणुकीत झालेली मतचोरी यामुळे आपला ८४१ मतांच्या अल्प फरकाने झालेला पराभव याकडे लक्ष वेधले. या मतदार यादी घोटाळ्याची गंभीर दखल घेत आदित्य ठाकरे यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न उधळून लावण्याची व याविरुद्धही आवाज उठविण्याची ग्वाही शेळके यांना दिली.
या भेटीत जयश्री शेळके यांनी बुलढाणा मतदारसंघाच्या मतदार यादीतील घोळ, वर्षानुवर्षे मोठ्या संख्येने असलेले मृत मतदार, दुबार मतदार, सागवन गावात एकाच घरात असलेले विविध जाती धर्माचे १२६ मतदार याकडे ठाकरेंचे लक्ष वेधले.युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी आज शनिवारी सविस्तर चर्चा केली.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेल्या बनावट नोंदी, एका मतदाराचे दुबार नावे, मोठ्या प्रमाणात मयत मतदारांची नावे, एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची नोंद तसेच नियोजनबद्ध पद्धतीने मोठ्या प्रमाणावर केलेल्या मतचोरीच्या तक्रारींचा तपशील युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडला
आदित्य ठाकरे म्हणाले…
दरम्यान या विषयावर बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की मतदार यादीतील हा महा घोळ चिंताजनक व लोकशाही साठी घातक आहे.शिवसेना सदैव जनतेच्या न्यायासाठी कटिबद्ध आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा आवाज दडपण्याचा कुठलाही प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी ग्वाही यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली
