बेहिशेबी मालमत्ता बाळगल्‍याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख हे आज अमरावतीच्या लाचलुचप प्रतिबंधक विभागाच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहे. यावेळी अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील आलेल्या ठाकरे गटातील शिवसेना कार्यकर्त्‍यांनी सरकारच्‍या तसेच बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.

हेही वाचा >>> नागपूर : शिक्षक उमेदवार अडबाले यांनी मानले महाविकास आघाडीचे आभार, म्हणाले…

नितीन देशमुख यांना एसीबीच्‍या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्‍याची नोटीस बजावण्‍यात आली होती. नितीन देशमुख हे शेकडो कार्यकर्त्‍यांसह अमरावतीत दाखल झाले. त्‍यांच्‍यासमवेत अमरावती जिल्‍ह्यातील कार्यकर्ते देखील आहेत. यावेळी एसीबीच्‍या कार्यालयासमोर कडक पोलीस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला होता. शिवसेनेच्‍या ठाकरे गटाच्‍या कार्यकर्त्‍यांनी सरकारच्‍या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. दरम्‍यान, नितीन देशमुख यांची एसीबीच्‍या कार्यालयात चौकशी सुरू झाली आहे.

देशमुख यांनी कपडेही घेतले सोबत

आमदार नितीन देशमुख यांनी कपडेही सोबत घेतले आहेत.  एसीबी कार्यालयात हजर झाल्यानंतर आपल्याला अटक केली जाईल, अशी शक्‍यता गृहित धरून आपण सोबत कपडे देखील आणल्‍याचे त्‍यांनी सांगितले. हुकूमशाहीच्या पद्धतीने सरकार चालू आहे, इंग्रजांपेक्षा हे खराब लोक आहेत. आम्ही तुरूंगात जाण्‍याची मानसिकता ठेवलेली आहे. गेल्‍या वेळी सुरतला गेलो होतो,तेव्हा माहिती नव्हती म्हणून कपडे सोबत नेले नव्हते, आज यावेळी कपडे घेऊन पूर्ण तयारीनिशी आल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

हेही वाचा >>> नागपूर : सुनील केदार यांची उमेदवारीबाबत मोठी घोषणा..; काँग्रेसचा शिक्षक मतदारसंघात यांना पाठिंबा

नितीन देशमुख यांच्या विरुद्ध एसीबीच्‍या कार्यालयात तक्रार देण्यात आली होती. देशमुख यांच्याकडे कंपनी, कारखाने, यांसह अनेक शेत-जमिनी असल्याचा आरोप करीत अकोल्यातील एका व्यक्तीने ही तक्रार दिली आहे. ही माहिती खुद्द नितीन देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली होती. तक्रार करणारा हा अकोल्यातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी, लुटमारी सारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. या तक्रारदाराला अकोल्यातील भूखंड माफिया, म्हणजे अकोल्याच्याच शिवसेनेच्या माजी आमदाराचा पाठिंबा आहे. याबरोबरच शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचा देखील पाठिंबा असल्याचे देशमुख म्हणाले.

तक्रारदार अन् मुख्यमंत्र्यांच्या संभाषणाची ध्‍वनिफित

दरम्यान, तक्रारकर्ता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाषणाची ध्‍वनिफित आपल्‍याकडे आली आहे, एसीबीला तक्रारदारासंदर्भात माहिती मागितली असून तक्रारदार तोच आहे, असे निष्पन्न झाल्यास मुख्यमंत्री अन् त्या व्यक्तीची ध्‍वनिफित माध्‍यमांसमोर ठेवल्या जाईल. असेही देशमुख म्हणाले. आपल्‍या विरोधात अनेक तक्रारी केल्या जात असून षडयंत्र रचल्या जात असल्याचे ते म्‍हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘भाजपच्या एकाही व्यक्तीवर ईडीची कारवाई नाही’

आतापर्यंत राज्यात ईडी कडून फक्त मराठी माणसांवर कारवाया झाल्या. भाजपच्या लोकांनी आतापर्यंत अब्जावधी रुपयांची संपत्ती गोळा केली आहे. जवळपास ३५० च्‍यावर लोकसभा खासदार भारतीय जनता पार्टीचे आहेत, १ हजारांवर त्यांचे आमदार आहे. परंतु यातील एकाही व्यक्तीवर आतापर्यंत इडी असो एसीबी असो, कारवाई झाली नाही. यांच्या किती संपती आहे. कुठून आणला यांनी एवढा पैसा? असा प्रश्न नितीन देशमुख यांनी उपस्थित केला.