भंडारा : ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्व असलेल्या प्राचिन खांब तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) वतीने करण्यात आला आहे. या भ्रष्टाचाराची माहिती जनतेला व्हावी याकरिता शिवसेनेच्या वतीने शहरात सर्वत्र ‘भ्रष्टाचार पे चर्चा’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे. सध्या या बॅनरची आणि त्यानिमित्ताने या कामातील भ्रष्टाचाराची चर्चा रंगू लागली आहे.
राज्य शासनाच्या नगर विकास खात्यामार्फत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मागील चार वर्षापासून शहरातील खांब तलाव सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. या अंतर्गत झालेल्या आणि सुरू असलेल्या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे.काही दिवसापूर्वी खांब तलावामध्ये रिटेनिंग वॉल (संधारक भिंत ) चे काम सुरू असताना जवळपास ५० फूट भिंत पडली होती आणि त्याहून जास्त लांबीची भिंत झुकलेली असून पडण्याच्या मार्गावर आहे. या सबंधीची तक्रार २८ जुलै २०२५ रोजी शिवसेना जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री तसेच नगर विकास मंत्री यांना देण्यात आली होती. मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नसल्याचे शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष संजय रेहपाडे यांनी सांगितले.
सदर खांब तलाव सौंदर्यीकरणाच्या कामावर अंदाजे ४० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून आतापर्यंत जवळपास ७०% खर्च झाल्याचे रेहपाडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामे असताना एकाही कामाचे स्वरूप, कामाची अंदाजे रक्कम, काम करणाऱ्या कंत्राटदाराचे नाव दर्शविणारा एकही फलक न लागणे, तिथल्या तिथेच थातूरमातूर कामे दाखवून बोगस बिल काढण्याचे प्रकार सुरू आहेत. शिवाय कंत्राटदारांना अशा प्रकारचे कामे करण्याचा कोणताही अनुभव नसताना यांना सदर कामे हे राजकीय आशीर्वादाशिवाय मिळू शकत नाही, यासाठी केवळ टक्केवारीचे धोरणच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेकडून यापूर्वी दिलेल्या निवेदनातून करण्यात आला होता.
परंतु शासन, प्रशासन दरबारी कार्यवाही होत नाही म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षातर्फे शहरातील नागरिकांमध्ये सदर भ्रष्टाचाराविषयीची जनजागृती करण्यासाठी भंडारा शहरातील चौका चौकात अनेक ठिकाणी बॅनर लावून “भ्रष्टाचार पे चर्चा ” असे अभिनव आंदोलन सुरू केले आहे.