चंद्रपूर : जिल्हा बँकेतील ३५८ पदांच्या नोकरभरती प्रकरणात माजी अध्यक्ष व संचालकांच्या मानगुटीवर ‘एसआयटी’ चौकशीचे भूत बसले. या चौकशीतून दिलासा मिळावा, यासाठीच काही संचालकांनी समजूत काढल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा बँकेचे माजी अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

मंगळवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, तसेच कीर्तीकुमार भांगडिया, किशोर जोरगेवार आणि करण देवतळे या जिल्ह्यातील तीन आमदारांच्या उपस्थितीत शिंदे यांनी शिवबंधनातून मुक्त होत भाजपचे कमळ हाती घेतले. भाजपच्या या खेळीने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकूण २१ संचालक आहेत. यात भाजपचे ९ संचालक आहेत. त्यापाठोपाठ शिदे यांच्यासोबत चार संचालक आणि इतर काँग्रेसचे संचालक होते. अध्यक्षपदासाठी भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू असताना आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी शिंदे यांना पद्धतशीरपणे गळाला लावले. बँकेवर वर्षानुवर्षे काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, ‘किंगमेकर’ भांगडिया यांनी काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांना राजकीय धोबीपछाड देत भाजपचा बँकेवरील सत्तेचा मार्ग मोकळा केला. शिंदे यांचा पक्षप्रवेश बँकेवरील सत्तेच्या दिशेने भाजपचे निर्णायक पाऊल समजले जाते. तसे झाल्या, शिंदे बँकेचे अध्यक्ष होणार असून संजय डोंगरे उपाध्यक्ष होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

येत्या २२ जुलैला बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. भाजप व शिंदे समर्थक संचालकांची संख्या आता १४ पर्यंत पोहचली आहे. बहुतमाचा आकडा गाठल्याने भाजपला ही निवडणूक सहज झाली आहे, तर काँग्रेसला नेत्यांच्या चुकीच्या रणनीतीमुळे तोंडघशी पडावे लागले आहे.

नोकरभरतीच्या चौकशीचा इशारा आणि पक्षप्रवेश

सोमवारी रात्री नागपुरातील एका हॉटेलात भाजप आमदार भांगडिया आणि काँग्रेससमर्थित संचालकांची बैठक पार पडली. याच बैठकीत खासदार धानोरकर यांनी अध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या काही संचालकांनी त्यांना पाठिंबा दिला. मात्र, किमान पाच संचालकांची तरी जुळवाजुळव करा, असेही त्यांना सांगण्यात आले. पाच संचालक पाठीशी नसल्याने धानाेरकर यांना नमते घ्यावे लागले, अशीही माहिती आहे. त्याचवेळी भाजपच्या काही नेत्यांनी नोकरभरती प्रकरणी एसआयटी चौकशीसंदर्भात संदेश पोहोचवला. या घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या ‘गोल्डन गँग’च्या संचालकांनी याच संधीचा फायदा घेत शिंदे यांची समजूत काढली आणि त्यांना भाजपमध्ये प्रवेशासाठी तयार केले. शिवसेना सोडण्याची शिंदे यांची इच्छा नव्हती. मात्र भाजपच्या छत्रछायेत चौकशीचे वार आपल्यापर्यंत पोचणार नाही, याची तजवीज या संचालकांनी केली, अशी चर्चा आहे.

तडीपार ठाकरेही भाजपत्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिंदेंसोबत भाजपमध्ये प्रवेश करणारे भद्रावती बाजार समितीचे माजी सभापती वासुदेव ठाकरे यांच्यावर दोनवेळा तडीपारीची कारवाई झाली आहे. आताही त्यांचा तडीपारीचा प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचे सांगितले जाते. तसेच त्यांनी मद्य प्राशन करून ताडोबात गोंधळ घातला होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्या ‘थार’ मोटारीची तोडफोडही करण्यात आली होती.