अकोला : तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणूक व आर्थिक लूट करण्याचे प्रमाण वाढले आहे. अकोला शहरातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला. ‘डेटिंग ॲप’वर ओळख झाल्यानंतर एका बँक अधिकाऱ्यासोबत समलैंगिक संबंध प्रस्थापित करून त्याची चित्रफित तयार केली. ती प्रसारित करण्याची धमकी देत बँक अधिकाऱ्याची ८० हजारांची लूट केल्याचा प्रकार शहरातून समोर आला आहे. या प्रकरणी खदान पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.
गुन्हेगार ॲपच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग, लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीसाठी अनेकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. अकोल्यातील एक बँक अधिकारी त्यात फसला. शहरातील खदान पोलीस ठाण्यांतर्गत एका बँक अधिकाऱ्यावर समलैंगिक अत्याचार करून त्याची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाली.
समलिंगी ‘डेटिंग ॲप’वरुन एका व्यक्तीने बँक अधिकाऱ्याशी संपर्क साधला. त्यातून दोघांची चांगली ओळख झाली. १४ जूनला हिंगणा फाट्याजवळ बँक अधिकारी आरोपी मनीष नाईक याला भेटायला गेले.
दोघे जण कारने शहरातल्या नदीच्या काठी गेले. या ठिकाणी त्याने बँकेच्या अधिकाऱ्यासोबत समलिंगी संबंध प्रस्थापित केले. आरोपीने त्याच्या इतर तीन साथीदारांना बोलावून घेतले. त्यांनी देखील अधिकाऱ्यावर अत्याचार केला. या समलैंगिक अत्याचाराचे मोबाइलवर चित्रीकरण केले. त्यावरुन बँक अधिकाराला ‘ब्लॅकमेल’ करण्यास सुरुवात केली.
पहिल्या टप्प्यात ३० हजार रुपयांपेक्षा अधिक रुपये घेतले. पैशांसाठी आरोपींचा तगादा सुरूच होता. पीडित अधिकाऱ्याकडून आरोपींनी ७९ हजार ३०० रुपये उकळले. तक्रार दाखल झाल्यावर या प्रकरणात टोळीला पकडण्यासाठी खदान पोलिसांनी विशेष सापळा रचला.
आरोपीला जाळ्यात अडकवण्यासाठी पीडित अधिकारी पुन्हा त्या आरोपींना भेटण्यासाठी गेला. मागावर असलेल्या पोलिसांनी तत्काळ आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणात मनीष नाईक रा. मलकापूर आणि मयूर बागडे रा. सरकारी गोडाऊन खदान असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. इतर दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली.
पीडितांनी समोर येण्याचे आवाहन
आरोपी मनीष नाईक हा समलिंगी पुरुषांना इंजेक्शन देऊन त्यांच्यात उत्तेजना निर्माण करत होता. त्यानंतर संबंधितांवर समलैगिंक अत्याचार करून ते आर्थिक लूट करीत होते. या चौघांनी ‘गे-डेटिंग ॲप’च्या माध्यमातून आणखी किती जणांची अशी फसवणूक केली? याचा तपास सुरू असून पीडितांनी समोर येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.