नागपूर : मुलीला पळून नेल्यानंतर पोलिसात तक्रार केल्यामुळे चिडलेल्या प्रेयसीच्या कुटुंबावर प्रियकराने तलवारीने हल्ला केला. कुटुंबातील दोघे गंभीर जखमी असून रुग्णालयात जीवन-मृत्यूशी संघर्ष करीत आहेत. ही घटना पारडी ठाण्यांतर्गत घडली. रमजान उर्फ मुनीर इकराम अंसारी (१९) रा. सबीना लेआऊट, आजरी-माजरी असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. आरोपी मुनीर याचे बिसमिल्ला नावाच्या महिलेच्या १६ वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध होते. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुलीच्या प्रेमसंबंधाची कुणकुण लागल्यामुळे कुटुंबियांनी तिला मारझोड करीत प्रेमसंबंध तोडण्यास दबाव टाकला. परंतु, मुलगी चोरून-लपून मुनीरला भेटायला जात होती.

मुनीरला दारु, गांजा आणि ड्रग्सचे व्यसन असून तो बेरोजगार आहे. त्याला कुटुंबियांनीसुद्धा घराबाहेर काढले आहे. मुनीरच्या प्रेमात वेडी झालेल्या मुलीने त्याला पळून जाऊन लग्न करण्यासाठी दबाव टाकला. त्यामुळे मार्च महिन्यात मुनीरने तिला घरून पळून नेले. अन्य शहरात पती-पत्नीप्रमाणे संसार सुरु केला. पोलिसांनी दोघांचाही शोध घेतला. मुनीरला अटक केली तर मुलीला पालकांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी मुनीरला अटक करुन कारागृहात रवानगी केली.  तेव्हापासून बिसमिल्ला आणि त्यांच्या कुटुंबाशी मुनीरचे वैमनस्य होते.

हेही वाचा >>> मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिसमिल्ला डेकोरेशनचा व्यवसाय करतात. रविवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास बिसमिल्ला या दीर, मुलगा आणि एका मजुरासह डेकोरेशनचे काम आटोपून दुचाकी वाहनांनी घरी जात होते. श्यामनगरजवळ मुनीर कारने विरुद्ध दिशेने आला. त्याने वेग वाढवून दुचाकी वाहनांना धडक देण्याचा प्रयत्न केला, मात्र ऐनवेळी बाजूला झाल्याने धडक झाली नाही. फटकारले असता मुनीर कारमधून बाहेर आला. कारमधून तलवार काढून चौघांवरही हल्ला केला. चौघापैकी दोघे गंभीर जखमी आहेत. चारही जखमींना उपचारार्थ मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच पारडीचे ठाणेदार मनोहर कोटनाके घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून मुनीरचा शोध सुरू केला आहे.