नागपूर : नागपुरात सोमवारी (१७ मार्च २०२५) दोन धार्मिक गटांत संघर्ष पेटल्यामुळे महाल, इतवारीसह परिसरात तणाव कायम आहे. तणावामुळे इतवारीतील किराणा ओळी सलग दोन दिवसांपासून बंद असल्याने शहरातील विविध भागातील किरकोळ दुकानात किराणा, खाद्यवस्तूंचा तुटवडा जाणवत असल्याचा दावा नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाने केला आहे.

नागपुरातील किराणा ओळीत मोठ्या संख्येने ठोक दुकानांसह त्यांचे गोदामही आहेत. या ठोक दुकानदारांकडून नागपूरसह विदर्भातील विविध जिल्ह्यात किराणा खाद्यवस्तुंचा नियमित पुरवठा होतो. दरम्यान नागपुरातील महाल परिसरात सोमवारी रात्री (१८ मार्च) दोन धार्मिक गटात संघर्ष पेटल्यावर जमावाकडून कुऱ्हाडी, राॅड, दगडासह मिळेल त्या वस्तूने पोलिसांसह सामान्य नागरिकांवरही हल्ला केला गेला. तर दुसरीकडे अनेक वाहने पेटवत घरातही शिरण्याचा प्रयत्न केल्यावर शहरातील महाल, इतवारी, हंसापुरीसह परिसरात तणाव आहे.

दरम्यान पोलिसांनी काही भागात संचारबंदी तर काही भागात जमाबंदीही लागू केली आहे. त्यामुळे नागपुरातील किराण्याचा ठोक बाजार दोन दिवसांपासून बंद आहे. याचा फटका शहरातील किराणा खाद्यपदार्थाच्या पुरवठ्यावरही होत आहे. नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचे महासचिव ज्ञानेश्वर रक्षक म्हणाले, नागपूर शहर आणि ग्रामीण भागाला ठोक किराणा, जिवनावश्यक खाद्यपदार्थ व वस्तुंचा पुरवठा इतवारी बाजारातून होतो. परंतु हा बाजार हिंसाचारामुळे दोन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शहरातील किरकोळ किराणा दुकानात खाद्यवस्तुंचा तुटवडा भासत आहे. हे बाजार आणखी बंद पडल्यास स्थिती बिघडण्याचा धोका आहे. परंतु दुकान उघडल्यास तेथे लुटीसह अनुचित प्रकार घडण्याचा धोका नकारता येत नाही. त्यामुळे शहरातील राजकीय, सामाजिक, व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन किराणा बाजारातील संचारबंदीबाबत चिंतन करावे. जेणेकरून पुन्हा पुरवठा सुरळीत होईल, असेही रक्षक म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकरण काय ?

नागपुरातील महाल परिसरात एका गटातील युवकांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्या गटावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमाव पांगावला. हा सर्व प्रकार सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडला. याचा परिणाम शहरातील सामान्य जनजीवनावर झालेला आहे. शहराच्या काही भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. पोलिसांनी महाल- गांधी गेटकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावर ‘बॅरिकेडींग’ करून मार्ग बंद केले आहे. तर काही भागात जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. दरम्यान या संचारबंदी व जमावबंदीमुळे इतवारीतील किराणा ओळी परिसरातील किराणाचे सर्व ठोक बाजार बंद आहेत. त्यामुळे शहरात किराणा खाद्यवस्तुंचा तुटवडा जाणवतो आहे