नागपूर : पावसाने अजून माघार घेतलेली नाही आणि पावसासोबतच साप, अजगर यासारख्या प्राण्यांनी देखील माघार घेतलेली नाही. वाढणाऱ्या पावसासोबतच त्यांचे बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. कधी घरात, कधी दुकानात तर कधी कार्यालयात साप निघण्याच्या अनेक घटना समोर येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र एक वेगळीच घटना घडली. चक्क कोंबडीच्या कळपात सहा फूट लांबीच्या अजगराने ठाण मांडले आणि मग त्या कोंबडीच्या मालकाची जी त्रेधातिरपीठ उडाली, ती वेगळीच.
चंद्रपूर शहरातील धवल कॉलनीमागे आंबेडकर सभागृहाजवळ अर्जून सुखदेवे राहतात. ते कोंबड्यांच्या व्यवसाय करतात. त्यांच्याकडे अंगणात कोंबडीच्या कळपात कोंबड्या होत्या. या कोंबडीच्या कळपात सहा फूट लांबीचा अजगर आढळला.
पहाटे तीन वाजता साखरझोपेत असताना त्यांना अचानक कोंबड्यांचा ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी थेट अंगणात धाव घेतली तर समोर आलेले दृश्य पाहून तेही थरारले. सर्व कोंबड्या कळपाच्या बाहेर आलेल्या होत्या आणि त्याठिकाणी मात्र भला मोठा अजगर त्यांना दिसला. तेवढ्या पहाटे त्यांनी सर्पमित्रांना भ्रमणध्वनीवरुन मदत मागितली. हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे अमित देशमुख यांना त्यांनी भ्रमणध्वनीवरुन माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी पाहणी केली असताना भला मोठा अजगर त्याठिकाणी गुंडाळी मारुन बसल्याचे त्यांना दिसून आले.
सोसायटीच्या सर्पमित्रांनी अतिशय शिताफीने त्या अजगराला पकडले आणि जंगलात मुक्त केले. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यापासून मूसळधार पावसाने ठाण मांडले. सगळीकडे पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. शहरात देखील अनेक भागांमध्ये सातत्याने पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशास्थितीत साप, अजगर, विंचू निघण्याचे प्रमाणही वाढत आहे. विशेषकरुन दलदलीच्या ठिकाणी, ज्याठिकाणी पाणी साचते त्याठिकाणी हे प्रकार अधिक घडत आहेत.
सुखदेवे यांच्या घराला लागूनच इरई नदी आहे आणि बराच कचरा वाढला असल्याने अजगराने त्याठिकाणाहून प्रवेश केला. समोरच कोंबड्या असल्याने अजगर आकर्षित झाला. मात्र, अजगराची चाहूल लागताच कोंबड्या बाहेर पडल्या आणि अजगराने मात्र त्याठिकाणी ठाण मांडले. मोठ्या शिताफिने हॅबिटॅट कन्झर्वेशन सेासायटीच्या सर्पमित्रांनी तेवढ्या पहाटे जाऊन अजगराचे सुरक्षित रेस्क्यू केले. यावेळी कोंबड्यांचा जीव वाचल्याने सुखदेवे यांनीही मोकळा श्वास सोडला.
शहरात कुठेही साप, अजगराच्या घटना घडल्यास हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीला भ्रमणध्वनीवरुन माहिती द्यावी, असे आवाहन सोसायटीने केले आहे.