नागपूर : स्मार्ट प्रीपेड मीटरला नागपूरसह राज्यातील बहुतांश शहरात विविध संघटनांकडून विरोध कायम आहे. या मीटरविरोधात मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर असलेल्या नागपुरातच जन आंदोलन सुरू झाले आहे. दरम्यान आंदोलकांनी शासनावर ते अदानीला लाभ पोहचवण्यासाठी स्मार्ट प्रीपेड मीटर लावले जात आहे, असा आरोप केला आहे. सरकारचे अदानीच्या कंपनीसोबत साटलोट आहे काय? असा प्रश्न आंदोलकांनी केला आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नागपूर जिल्हा शाखेने नागपूर शहरातील बांगलादेश परिसरातील कामगर नगर येथे स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात एक दिवसाच्या प्रतीकात्मक उपोषण केले. यावेळी हे आंदलन आता सर्वत्र करण्याची घोषणाली केली गेली. कामगर नगर येथील पोलिस ठाण्यातच हे उपोषण करण्यात आले. तर याच दिवशी संध्याकाळी चक्क पोलीस ठाण्यातच जाहीर सभा घेतल्याचा आंदोलकांचा दावा आहे. जाहीर सभेचे प्रमुख नेते स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधीत कृती समितीचे संयोजक मोहन शर्मा होते. तर सभेला वीज कामगार नेते युगल रायलू, दिनेश अंडर सहारे उपस्थित होते. आंदोलकासाठी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साठवणे होते.
काँग्रेस पक्षाचे रामदास पराते आणि आम आदमी पक्षाचे नेते यांनी सभेला संबोधित केले. संचालन यशवंत बुरडे यांनी केले तर आभार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नागपूर शहर सचिव संजय राऊत यांनी मानले. याप्रसंगी योगेश विनेकर, मारोतराव हिंगवे, सुखदेव हेडाऊ, श्याम निखारे, राजू निखारे, ईश्वर शेंद्रे, ईश्वर मसुरकर, प्रतीक दडवे, सुखदेव सोनकुसरे, तुकाराम पराते, इंद्रनाथ खिचे, रवींद्र निखारे, गणेश वाकोडीकर, ठाकूरदास टिकम, मधुकर शिरकर, उमेश बुरडे, प्रेम बोकाडे, नारायण महाजन, मदन पखाले उपस्थित होते. हे आंदोलन आता शहरातील विविध भागात तिव्र केले जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे पुढील आंदोलन कुठे होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
गौतम अदानीसाठी २५ दशलक्ष वीज मीटर…
आंदोलनादरम्यान मोहन शर्मा म्हणाले, महाराष्ट्रातील २५ दशलक्ष वीज मीटर केवळ गौतम अदानी यांच्या कंपनीला फायदा व्हावा यासाठी बदलले जात आहेत. स्मार्ट मीटर बसवल्याने सुमारे २८ हजार कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागतील. युगल रायलू म्हणाले की, चांगले काम करणारे मीटर काढून नवीन मीटर बसवणे हे महाराष्ट्राच्या जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. सरकारने हे पैसे शिक्षण आणि आरोग्यावर खर्च करावेत.
