नागपूर: भारतासह विदेशातही आयुर्वेद उपचाराकडे रुग्णांचा कल वाढत आहे. दरम्यान जर्मनीतील फ्रोझन शोल्डर, सांधेदुखी, पाठदुखीच्या काही रुग्णांकडून थेट नागपूर गाठून आयुर्वेद उपचार घेतला गेला. त्यामुळे नागपुरातील आयुर्वेद उपचारालाही जगात पसंती वाढत असल्याचे दिसत आहे. या जर्मनीच्या रुग्णांवरील उपचाराबाबत आपण जाणून घेऊ या.
पाश्चिमात्य देशातूनही रुग्ण आयुर्वेदात आशा बाळगून भारतात येऊ लागले आहेत. नुकतेच जर्मनीमधील तीन रुग्ण नागपुरात आयुर्वेदीय उपचारासाठी आले होते. फ्रोझन शोल्डर, सांधेदुखी, पाठदुखी आणि सेरेब्रल पाल्सी यांसारख्या आजारांवर त्यांनी २१ दिवस नागपुरातील शंकरपुर स्थित मेडआयु मल्टिस्पेशालीटी रुग्णालयात उपचार घेतले. गॅसर (वय- ६०) या महिलेला फ्रोझन शोल्डर आणि सांधेदुखीचा दीर्घकालीन त्रास होता. अॅलोपॅथी औषधोपचार सुरू असले तरी त्यातून केवळ तात्पुरता आराम मिळत होता, त्यामुळे त्या समाधानी नव्हत्या. त्यांनी आयुर्वेदिक उपचार घेण्याचा निर्णय घेतला. इंटरनेटवर सखोल माहिती घेतल्यानंतर त्यांनी नागपूरच्या शंकरपूर येथील मेडआयु हॉस्पिटल गाठले.
सदर केंद्रात आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी, निसर्गोपचार आणि अॅलोपॅथी यांचा समन्वय साधून रुग्णाची सर्वांगीण चिकित्सा केली जात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. येथील रुग्णालयाचे संचालक ज्येष्ठ आयुर्वेद डॉक्टर धनराज गहुकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर पंचकर्म थेरपी, फिजिओथेरपी, निसर्गोपचार, दररोज योग व ध्यान, समुपदेशन आणि उपचारात्मक आहार अशा बहुआयामी उपचारपद्धतीने उपचार झाले.
२१ दिवसांत त्यांचे वजन कमी झाले. सोबत जुन्या वेदनांमध्ये लक्षणीय आराम मिळण्यासह काही वैद्यकीय समस्यांवर मातही मिळाल्याचा दावा रुग्णाने केला. तीस वर्षीय जान या रुग्णाला अनेक वर्षांपासून पोस्ट ट्रॉमॅटिक सेरेब्रल पाल्सी आहे. त्याला आजारामुळे शरिराच्या हालचालीवर मर्यादा आहे. नागपुरात आयुर्वेद उपचारादरम्यान पंचकर्म आणि दररोजच्या योगामुळे त्याच्या स्नायूंमध्ये अधिक लवचिकता आली.
शरीर अधिक सैलावले. ६९ वर्षीय जामी सततच्या पाठदुखीने त्रस्त होत्या. नागपुरात आयुर्वेदिक उपचाराद्वारे त्यांना काही दिवसांतच दुखणे बरे झाले आणि मेटाबॉलिझम सुधारले. दरम्यान रुग्णांनी जर्मनीला परत जातांना नागपुरातील शंकरपुर येथील मेडआयु रुग्णालय परिसरामुळे मला आंतरिक शांतता मिळाली. रुग्णालयातून मी एकदम ताजीतवानी वाटत बाहेर पडत असल्याचे मत नोंदवले. नागपुरातील उपचारामुळे आरोग्याविषयीची आमची दृष्टीच बदलल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉक्टर काय म्हणतात?
ज्येष्ठ डॉ. धनराज गहूकर म्हणाले, जगभरात प्रतिबंधात्मक तसेच एकात्मिक उपचार पद्धतींसाठीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णांचा भारतासह नागपुरातील उपचाराकडेही कल वाढत आहे. नागपुरातील मेडआयुतही या तीन जर्मनीतील रुग्णांसह इतरही देशातील रुग्ण उपचाराला येण्याची संख्या वाढली आहे. या आधुनिक उपचाराने भारताचे नाव जगभरात होण्यास मदत होत आहे.