बुलढाणा : दारुड्या पित्याची सख्खा मुलाने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना खामगाव तालुक्यातील लोणी गुरव या गावात बुधवारी उघडकीस आली.घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीणचे ठाणेदार व कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले.आरोपी मुलास ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. गोरख हिवराळे ( वय ५५ वर्षे, रा.लोणी गुरव,) असे निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.ते बुधवारी सकाळी लोणी गुरव येथील राहत्या घरात अंथरुणावर मृता अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती लोणी गुरव येथील पोलीस पाटील व अन्य नागरिकांनी खामगाव ग्रामीण पोलिसांना दिली.
प्राथमिल चौकशीत गोरख हिवराळे याचा मुलगा धनंजय गोरख हिवराळे यानेच पित्याची निर्घृण हत्या केल्याचे निष्पन्न झाले. गोरख हिवराळे याला दारूचे व्यसन जडले होते. दारू ढोसून गोरख हा आपल्या पत्नीला दररोज मारहाण करायचा. आपल्या जन्मदात्या आईला दारुड्या बाप रोज मारतो याची आरोपी धनंजय ला चीड झाली होती. यामुळे त्याने बापाला कायमचे संपवायचे मनोमन ठरविले.
मंगळवारी, २९ एप्रिल रोजी रात्री उशिरा धनंजय याने जाड लाकडी दांड्याने दारूच्या नशेत निपचित झोपलेल्या आपल्या बापावर लाकडी दांड्याने वार केले. यामुळे गोरखचा मृत्यू झाला. दरम्यान गोरख हिवराळे हा मूळचा बोथा काझी ( तालुका खामगाव) चा रहिवासी होता. मात्र काही वर्षांपूर्वी तो आपले सासर असलेल्या लोणी गुरव येथे राहवयास आला असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्घृण हत्येने लोणी गुरव गाव हादरले असून गावावर शोक कळा पसरली आहे.