राज्याच्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा
देशाच्या राजधानीत गणराज्य दिनी राजपथावर सादर झालेल्या पथसंचलनात महाराष्ट्राच्या ‘सोंगी मुखवटे’ या लोकनृत्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे. यात नागपूरच्या विविध शाळेतील १५० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
गेल्या दोन महिन्यांपासून दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात शहरातील २० शाळांतील १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सोंगी मुखवटे या पारंपरिक नृत्याची दिवस रात्र तालीम केली. गणराज्य दिनाच्या दिवशी महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर आला. त्यावेळी अनेकांनी याची देही याची डोळा त्यांच्या नृत्याचा आनंद घेतला. महाराष्ट्राच्या लोकनृत्याला प्रथम क्रमांक मिळाल्याचे सांस्कृतिक मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आले आणि नागपूरच्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा रोवला गेला. केंद्राच्या परिसरात या नृत्याची तालीम सुरू असताना केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या पद्मश्री गीता महलिक, विनोद कुमार, सविता राणा, अजय चौधरी, लक्ष्मीनारायण गेल्या महिन्यात नागपुरात आले असताना या नृत्याची निवड केली होती, तेव्हापासून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. महाराष्ट्राच्या लोकनृत्याला प्रथम क्रमांक मिळाल्याचे जाहीर होताच विद्यार्थ्यांनी दिल्लीमध्ये जल्लोष केला. नाशिक जिल्ह्य़ातील अंबादास श्रावण गौरी यांनी नृत्याचे प्राथमिक शिक्षण दिल्यानंतर मुंबईतील सुप्रसिद्ध कोरियोग्राफर अरविंत राजपूत यांनी त्यांना मार्गदर्शन केले. अंबादास गवळी यांच्यासह नीलेश भोयर, प्रियंका फुलझेले, विवेक नाहतकर, महेंद्र आरेवार यांनी या नृत्यासाठी मेहनत घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या चित्ररथाची दखल घेऊन विद्याथ्यार्ंचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांचे आज स्वागत
देशाच्या राजधानीत गणराज्य दिनी राजपथावर सादर करण्यात आलेल्या ‘सोंगी मुखवटे’ या चित्रथाला प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर या नृत्यामध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी उद्या, गुरुवारी जीटी एक्सप्रेसने नागपुरात पोहोचत आहे. या सर्व विद्यार्थ्यांंचे स्वागत करण्यासाठी नागपूरकरांनी रेल्वे स्थानकावर पोहोचावे, असे आवाहन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.