नागपूर : उपराजधानीतील गणेशपेठ बसस्थानकावर मंगळवारी सकाळी गडचिरोलीतील अहेरीला जाण्यासाठी प्रवासी पोहचले. परंतु, डिझेल नसल्याने लांब पल्ल्याच्या बसेस रद्द झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चार तास वाया घालवत प्रवाशांना रिकाम्या हाती घरी परतावे लागले. परंतु, एसटीच्या अधिकाऱ्यांकडून मात्र सेवा सुरळीत असल्याचा दावा करण्यात आला.

शहरातील मध्यवर्ती बसस्थानक असलेल्या गणेशपेठला रोज हजारोच्या संख्येने प्रवासी राज्यातील विविध भागात जाण्यासाठी येत असतात. या स्थानकावर गणेशपेठ, इमामवाडा, वर्धमाननगरसह इतरही आगारांच्या बसेस येतात. अहेरी येथे राहणारे लीलाधर कसारे काही दिवसांपूर्वी नागपुरात काही कामानिमित्त आले होते. त्यांना मंगळवारी अहेरीला परत जायचे असल्याने ते नातेवाईकांसह गणेशपेठ बसस्थानकावर सकाळी ८.३० वाजता गेले.

हेही वाचा >>> तोटय़ातील ‘एसटी’ला सावरण्यासाठी कामगार संघटनांना साकडे

बसस्थानकावर ९ वाजता अहेरीच्या दिशेला बस निघणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार ते फलाटावर आले. परंतु, ११ वाजल्यावरही बस सुटत नसल्याने त्यांनी तेथील काही एसटी कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यावर बसमध्ये डिझेलच नसल्याने ती जाणार कशी? हा प्रतिप्रश्न त्यांना विचारला गेला. आणखी काही ठिकाणांकडे जाणारी बसही डिझेल अभावी रद्द झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. दोन वाजतापर्यत वाट बघितल्यावरही अहेरी जाणारी बस जागेवरून हलत नसल्याचे बघत शेवटी ते नागपुरातील नातेवाईकांकडे परतले.

हेही वाचा >>> महावितरणचा उपकार्यकारी अभियंता लाच स्वीकारताना ‘एसीबी’च्या जाळ्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याविषयी एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रल्हाद घुले यांना विचारले असता त्यांनी कोणत्याही आगारातून डिझेल नसल्याचे व या पद्धतीने बसफेरी रद्द झाल्याचे सांगण्यात आले नसल्याचे सांगितले. एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर इमामवाडा आगारातील काही बसेस रद्द झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तर एसटी महामंडळातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र सगळ्याच आगारात आवश्यक संख्येने डिझेल असल्याने बसेस रद्द होण्याचा प्रश्नच नसल्याचा दावा केला.