अमरावती : राज्‍यात खरीप हंगामासाठी १९.२१ लाख क्विंटल बियाण्‍यांच्‍या गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार २१.७८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. राज्यात १६ लाख ८२ हजार २४५ क्विंटल (८७ टक्‍के) बियाणे पुरवठा झालेला आहे. त्यामुळे राज्यात खरीप हंगामासाठी आवश्यक बियाणे साठा उपलब्ध आहे. बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेते यांच्याकडून बियाणे खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

कमी पावसामुळे सद्य:स्थितीत पेरणीची कामे संथ गतीने सुरू आहेत. यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच प्रामुख्याने भात रोपवाटीकेची कामे सुरू आहेत. १ जून ते १० जुलै या कालावधीमध्ये राज्याचे सरासरी पर्जन्यमान ३१४.३ मि.मी. असून या खरीप हंगामात १० जुलैपर्यंत प्रत्यक्षात २२७.३ मि.मी. एवढा पाऊस झाला आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात पाऊस पडल्यास पेरणीच्या कामास वेग येईल.

हेही वाचा – फडणवीसांबाबत कलंक हा शब्द प्रयोग योग्यच, कॉंग्रेस नेते अतुल लोंढे स्पष्टच बोलले

खरीप हंगामासाठी राज्यास ४३.१३ लाख मे.टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून आतापर्यंत ४६.०७ लाख मे.टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यापैकी १८.९५ लाख मे.टन खतांची विक्री झालेली आहे. सद्यस्थितीत राज्यात २७.१२ लाख मे.टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी.

हेही वाचा – नागपुरातील मेयो रुग्णालयाच्या वार्डात आग, रुग्णांची पळापळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृषीविषयक योजनांच्या माहितीसाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी १८००२३३४००० हा हेल्पलाईन क्रमांक आहे. शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार त्याचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना (पीएमएफबीवाय) खरीप हंगामामध्ये सहभागी होण्याची अंतीम मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.