नागपूर: तुर्की व अझरबैजान देशांनी पाकिस्तानला जाहिर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भारत सरकारने तुर्की आणि अझरबैजानसोबत रत्न आणि दागिन्यांच्या व्यापारावर पूर्णपने बंदी घालावी, अशी मागणी ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलकडून (जीजेसी) सरकारला केली गेली.

ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (जीजेसी) भारताच्या देशांतर्गत रत्न आणि दागिने उद्योगाचे प्रतिनिधीत्व करणारी सर्वोच्च संस्था आहे. जीजेसीने ऑपरेशन सिंदूरला आपला पाठिंबा जाहीर केला. जीजेसीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश रोकडे म्हणाले, पहलगाममध्ये दहशतवादी हल्यात देशातील २६ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवादी व पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले.

दरम्यान तुर्की व अझरबैजानने पाकिस्तानला जाहिर पाठिंबा दिला होता. दोन्ही देशांच्या भूमिकेमुळे भारतातील सुरक्षा आणि व्यापार संबंधाच्या दिशेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे तुर्की आणि अझरबैजानसोबत दागिने व रक्त व्यवसाय थांबवण्याची मागणी सरकारला केल्याचेही रोकडे यांनी सांगितले. व्यवसायापेक्षा आमचे देशाला प्राधान्य आहे. त्यामुळे सराफा उद्योगातील उद्योजकांनी ज्वेलर्स, उत्पादक, व्यापारी आणि घाऊक विक्रेत्याला तुर्की आणि अझरबैजानसह सर्व व्यवहार थांबवण्याचे आवाहनही आम्ही केल्याचे रोकडे यांनी सांगितले. भारताच्या सन्मान आणि सुरक्षेप्रती आपली प्रामानिकता व निष्ठा दाखवून जगाला सराकात्मक संदेश देण्यासाठी हे पाऊल उचलल्याचेही त्यांनी सांगितले. जीजेसीचे उपाध्यक्ष अविनाश गुप्ता म्हणाले, व्यापार हा केवळ नफ्यापुरता नसतो, तो तत्त्वावरही असतो. तुर्की व अझरबैजानने पाकिस्तानला समर्थन देणे चुकीचे आहे. त्यामुळे या दोन्ही देशांसोबतचे रत्न व दागिनेबाबतचे व्यवहार थांबवण्याच्या आमच्या संकल्पावर आम्ही ठाम राहून राष्ट्राप्रती आमची बांधिलकी दाखवत असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.

तुर्कीच्या अर्थव्यवस्थेत भारतीयांचे योगदान मोठे

उड्डाणे, हॉटेल्स आणि डेस्टिनेशन वेडिंगवर पर्यटन खर्च करून भारतीय पर्यटकांनी तुर्कीच्या अर्थव्यवस्थेतही लक्षणीय योगदान दिले आहे, असे जगातील विविध अहवालातून स्पष्ट झाले आहे. अशाच भावना अझरबैजानच्या बाबतीतही आहेत. परंतु या दोन्ही देशांनी पाकिस्तान- समर्थक भूमिका घेतली आहे. त्यामुळे हे दोन्ही देश भारतविरोधी भूिका दर्शवत असल्याचे दिसते. त्यामुळे भारत सरकारने तुर्की आणि अझरबैजानसोबतचे रत्न व दागिने व्यवसायाबाबतचे सर्व संबंध संपुष्टात आणून व्यवसाय थांबवण्याची मागणी जीजेसी संघटनेद्वारे करण्यात आली आहे.