लोकसत्ता टीम

अमरावती: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने शेतीवर संकट निर्माण केलेले असतानाच. रविवारी पहाटे शहरात विजांचे तांडव अन् सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस झाला. जिल्ह्यातील अनेक भागात भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. या वादळाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेच्या तारा तुटल्या, खांब कोसळले. त्यामुळे गेल्या ८ तासांपासून शहरातील बहुतांश भागात वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

पावसाचा जोर वाढल्यानंतर नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील काही कक्षांमध्ये देखील पाणी शिरल्याने रुग्णांची हाल झाले. दस्तूर नगर ते राजापेठ या मुख्यमार्गावर तीन ते चार ठिकाणी मोठमोठाली झाडे कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. विजेच्या तारा तुटून वीज पुरवठा खंडित झाला आहे. महावितरण कंपनीचे कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

आणखी वाचा- बुलढाणा: ऐन उन्हाळ्यात नदीला पूर, दुथडी भरून वाहतंय पाणी; कुठं घडलं आक्रीत, वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी पहाटे मुसळधार पाऊस सुरू झाला. जवळपास पाऊणतास कोसळलेल्या या पावसाने शहरातील नाले तुंबून पाणी रस्त्यांवरून वाहू लागले. त्यामुळे रस्त्यांना नाल्यांचे रूप आले होते. अनेक ठिकाणी वादळामुळे झाडे उन्मळून पडली. वादळी पावसाचा दरदिवशी प्रत्येक तालुक्यात फटका बसत असल्याने नागरिक व शेतकरी त्रस्त झाले असून पिकांचे नुकसान होत असताना प्रशासनाकडून पंचनामे व मदतीसाठी कोणतीही हालचाल नसल्याने रोष व्यक्त होत आहे. आजही जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.