चंद्रपूर: आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व भविष्यात आश्रमशाळेतून वैज्ञानिक निर्माण व्हावे या उद्देशाने, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर कार्यालयअंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली.

चंद्रपूर प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील १६ विद्यार्थी व चिमूर प्रकल्प कार्यालयाअंतर्गत ३ असे एकूण १९ विद्यार्थी इस्रो शैक्षणिक दौऱ्यात सहभागी झाले होते. सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम. यांच्या संकल्पनेतून या विद्यार्थ्यांना इस्त्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेण्याची संधी मिळाली. शैक्षणिक दौऱ्यादरम्यान सहायक प्रकल्प अधिकारी बोंगिरवार तसेच एस. श्रीरामे, एम. डी. गिरडकर, एच.डी. पेदोंर आदी कर्मचारी विद्यार्थ्यांसमवेत होते.

हेही वाचा – दुर्गम भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांची ज्येष्ठतासूची प्रसिद्ध, ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल

४ ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीत इस्रो सहलीचे आयोजन करण्यात आले होते. बेंगलोर येथील इस्रो केंद्राला भेट देवून सर्व विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांची भेट घेतली. यावेळी चंद्रयान-३ प्रक्षेपणाची संपूर्ण माहिती तसेच चंद्रयान प्रक्षेपणात वापरण्यात आलेल्या विविध साधनांची माहिती शास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांना दिली. त्यासोबतच श्रीरंगपट्टनम येथील टिपू सुलतान पॅलेस, टिपू सुलतान समाधी, वृदांवन गार्डन, प्राणी संग्रहालय येथे भेट तसेच म्हैसूर शहरातील ऐतिहासिक व भौगोलिक बाबींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

हेही वाचा – आरक्षणासाठी धमक्या किती सहन करणार?- छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; विधिमंडळात चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकरीता नाविण्यपूर्ण उपक्रम मंजूर करुन इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेण्याची संधी तसेच या माध्यमातून एखादा शास्त्रज्ञ घडू शकतो हा या सहलीमागचा उद्देश असल्याचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी सांगितले