लोकसत्ता टीम

नागपूर : सेल्फोस विष प्राशन केलेल्या एका अत्यवस्थ तरुणाचा जीव नवीन पद्धतीचे उपचार तंत्र वापरून वाचवण्यात यश आले आहे. मध्य भारतात प्रथमच या पद्धतीचा वापर झाला. त्यामुळे भविष्यात हे तंत्र या पद्धतीचा रुग्णांसाठी संजीवनी ठरण्याची शक्यता आहे.

प्रमोद हिवळे (३६) रा. छत्तीसगड असे रुग्णाचे नाव आहे. प्रमोदने कीटकनाशकासाठी वापरले जाणारे सेल्फोस पावडर चुकीने सुमारे २० ग्रॅम प्राशन केले. थोड्याच वेळात त्याची प्रकृती खालावली. कुटुंबीयांना कळताच त्यांनी प्रथम जवळच्या खासगी रुग्णालयात व तेथून नागपुरातील सेंट्रल ॲव्हेन्यू क्रिटिकल केअर रुग्णालयात हलवले. डॉ. राजेंद्र चांडक यांनी उपचार सुरू केले. दरम्यान, सेल्फॉस पावडर पाणी वा हवेच्या संपर्कात आल्यावर त्यातून अतिविषारी गॅस तयार होते. पावडर शरीरात गेल्यावर एक – एक अवयव निकामी होतात. या रुग्णाच्या पेशीतही बदल दिसत होते.

आणखी वाचा-जागतिक उच्च रक्तदाब दिन विशेष : ४० टक्के रुग्णांना उच्च रक्तदाबाची समस्या

डॉ. चांडक यांनी रुग्णाचे सलग १६ तास रक्त शुद्धीकरण केले. ३ युनिट रक्त बाहेर काढत नव्याने ३ युनिट रक्त दिले. औषधांनी त्याला वारंवार शौच होऊ दिली. त्यामुळे पोट स्वच्छ झाले. तीन दिवसांनी रुग्ण धोक्याबाहेर आला. त्यानंतर सलग पाच दिवस त्याला डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवले गेले. यशस्वी उपचाराने रुग्ण गुरुवारी ठणठणीत होऊन परतल्याची माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. आर. जी. चांडक यांनी दिली. डॉ. एस.डी. सूर्यवंशी, डॉ. किरण पटेल, डॉ. आर. गणेशे, डॉ. संजय मानकर, डॉ. गौरव बंसोड, डॉ. सुनील बंगाल, ललित खोब्रागडे यांनी या उपचारात महत्त्वाची भूमिका पार पाडली.

आणखी वाचा-नागपूर : अल्पवयीन भाचीसह १८ वर्षाच्या मावशीवर बलात्कार, पीडितेची प्रकृती बिघडल्यामुळे उलगडा…

रुग्णाचा ईसीजी हृदय रोगाचा झटका आल्यासदृश्य

हा रुग्ण रुग्णालयात येताच त्याचा तातडीने इसीजी काढण्यात आला. त्यात डॉक्टरांना रुग्णाला हृदयरोगाचा झटका आल्यासारखे संकेत दिसले. उपचारादरम्यान त्याचा रक्तदाबही खाली- वर होत होता. त्यामुळे डॉक्टरणांना उपचारादरम्यान सर्व गुंतागुंतीवर लक्ष ठेवावे लागले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सेल्फोस विष प्राशन केलेले रुग्ण सहसा वाचत नाहीत. आम्ही नातेवाईकांच्या परवानगीने प्रथमच नवीन पद्धतीच्या तंत्राने उपचार केला. मध्य भारतात या पद्धतीच्या तंत्राने वाचलेला हा पहिला रुग्ण आहे. या नवीन तंत्राचा विष प्राशन केलेल्या इतर रुग्णांवर उपचारासाठी लाभ होईल.” -डॉ. राजेंद्र चांडक, संचालक, सेंट्रल ॲव्हेन्यू क्रिटिकल केअर रुग्णालय.