नागपूर : बालेकिल्ल्यात भाजपला पराभूत करून नागपूर शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले सुधाकर अडबाले आहेत कोण, याबाबत उत्सुकता आहे. सुधाकर अडबाले मुळचे चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. मुळात काँग्रेस विचारसरणीचे असलेले अडबाले सुरुवातीपासून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाशी संबंधित आहेत. यापूर्वी त्यांनी ही निवडणूक लढवण्याची इच्छा संघटनेकडे व्यक्त केली होती, पण त्यांना संधी नाकारली. कालांतराने संघटनेत फूट पडली, पण अडबाले मूळ संघटनेशी जुळून राहिले. या वेळी निवडणूक लढवायची ठरवून ते कामाला लागले.

अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर दीड वर्षांपूर्वीच अडबाले यांनी तयारीला सुरुवात केली होती. दीड वर्षांच्या कालावधीत सहाही जिल्ह्यांत संपर्क, समविचारी संघटना, समविचारी पक्षांशी जुळवून घेत अडबाले यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाल्यानंतर अडबाले यांनी मागे वळून न पाहता थेट विजयापर्यंत मजल मारली. मागील १० वर्षांपासून या राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी ते आंदोलन करत आहेत. हाच मुद्दा घेऊन ते निवडणुकीत उतरले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले, राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करूच शकत नाही. परंतु ज्या ज्या राज्यांमध्ये काँग्रेस समर्थित सरकार आहे त्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे मान्य केले आहे. हे शिक्षकांना पटवून देण्यात अडबाले यशस्वी झाले. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ हा एके काळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा गड होता. डी. यू. डायगव्हाणे या मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले होते. २०११ मध्ये भाजपकडे गेलेली जागा परत मिळवण्यात शिक्षक संघाला यश आले.