लोकसत्ता टीम

चंद्रपूर : शिवसेनेतील महाबंडानंतर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी महायुती सरकारला समर्थन जाहीर केले. तेव्हापासून राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार पुन्हा एकत्र येतील, अशी चर्चा जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि महायुतीत सहभागी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन झाले. या दोघांचे मित्र श्रीकांत रेगुंडवार यांच्या निवासस्थानी सोमवारी पहाटे मैत्रीचा हा नवा अध्याय सुरू झाला. या मनोमिलानाने मुनगंटीवार व जोरगेवार यांचे कार्यकर्ते सुखावले आहेत.

गुरू-शिष्याच्या नात्यात वितुष्ट येण्याचे कारण काय?

सुधीर मुनगंटीवार व अपक्ष किशोर जोरगेवार यांच्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपासून वितुष्ट होते. जोरगेवार भाजपमध्ये सक्रिय असताना सुधीर मुनगंटीवार यांचे शिष्य होते. मात्र २००९ व २०१४ या दोन्ही विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी दिली नाही म्हणून किशोर जोरगेवार नाराज झालेत. त्यांनतर भाजपला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ५० हजारापेक्षा अधिक मते घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निवडणुकीच्या रिंगणात उतरू नका, असे मुनगंटीवार यांनी सांगितल्यानंतरही जोरगेवार यांनी बंडखोरी करीत निवडणूक लढवली. तिथूनच जोरगेवार व मुनगंटीवार यांच्यात वितुष्ट आले. त्यानंतर दोघेही एकमेकांना पाण्यात पाहू लागले.

आणखी वाचा-योगी आदित्यनाथ यांच्याकडून अयोध्या दर्शनाचे आमिष! दर्शनाला येणाऱ्यांची सर्व व्यवस्था करण्याचा दावा

२०१९ मध्ये नेमके काय घडले होते?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जोरगेवार बऱ्याच राजकीय घडामोडीनंतर पुन्हा एकदा अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले. यावेळी जोरगेवार यांनी ७५ हजारापेक्षा अधिक मतांची आघाडी घेत भाजपचे दोन टर्मचे आमदार नाना शामकुळे यांचा दारुण पराभव केला. तेव्हापासून मुनगंटीवार व जोरगेवार यांच्यातील कटुता आणखी वाढली. ही कटुता इतकी वाढत गेली की तीन ते चार वेळा सार्वजनिक कार्यक्रमात देखील दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली. सार्वजनिक ठिकाणी वाद झाले. बऱ्याच जणांना वाटायचे की या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे. यासाठी अनेकांनी पुढाकार देखील घेतला. मात्र दोघांची काही केल्या मैत्री होत नव्हती. ही मैत्री व्हावी म्हणून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री शोभा फडणवीस यांच्यासह दोघांचे मित्र अजय जयस्वाल यासह बरेच जण प्रयत्नरत होते.

काँग्रेस नेत्यांनीही घेतली होती जोरगेवार यांची भेट

लोकसभा निवडणुकीत महायुतीची उमेदवारी सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर आली. आतातरी दोघे एकत्र येणार, अशी चर्चा सुरू झाली. मात्र मुनगंटीवार यांचे नामांकन दाखल करण्यासाठी जोरगेवार आलेच नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला पेव फुटले. त्यात महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी जोरगेवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यामुळे जोरगेवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आणखी वाचा-रणसंग्राम लोकसभेचा : दक्षिण नागपुरात काँग्रेस-भाजपसाठी समान संधी; जाणून घ्या सविस्तर…

आता सहकार्य कराल तर…

दोन दिवसांपूर्वी मुनगंटीवार यांनी जोरगेवार समर्थक माझ्यावर समाज माध्यमावर वाईट टीका करीत आहेत. हा प्रकार योग्य नाही. जोरगेवार यांनाही भविष्यात विधानसभा निवडणूक लढायची आहे. त्यांनी आता सहकार्य केले तर आम्ही देखील सहकार्य करू, अशी प्रतिक्रिया माध्यमांमध्ये. हा वाद सुरू असतानाच दोघांचे मनोमिलन व्हावे यासाठी पुन्हा काही मित्रमंडळी कामाला लागले. एमआयडीसी असोशीएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा व स्नेहांकितचे अध्यक्ष डॉ. अशोक वासलवार यांनी मुनगंटीवार व जोरगेवार यांची स्वतंत्र भेट घेत किमान चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र या अशी विनंती केली. तेव्हापासून हळूहळू मैत्रीचे सुत जुळायला सुरुवात झाली.

पहाटेच्या भेटीची फलश्रूती

मुनगंटीवार व जोरगेवार या दोघांचे मित्र श्रीकांत रेगुंडवार यांच्या निवासस्थानी दोघांची भेट ठरली. सोमवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास ही भेट झाली. जवळपास एक तास झालेल्या या बैठकीत मुनगंटीवार यांनी सर्वप्रथम जोरगेवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे निमंत्रण दिले. त्यानंतर आजवर झालेल्या काही वादाच्या विषयावर चर्चा झाली. यातून मध्यमर्ग काढण्यात आला. तसेच जोरगेवार समर्थक समाज माध्यमावर टीका करीत असल्याबद्दल निदर्शनास आणून दिले असता याच्याशी आपला काही संबंध नाही, असे जोरगेवार यांनी सांगितले. तसेच लोकसभा निवडणुकीत सोबत प्रचार करण्याचा शब्द दिला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पहाटेपर्यंत सुरू होती, अशी माहिती स्वतः जोरगेवार यांनी दिली.

आणखी वाचा-काँग्रेसवर टीका करताना वनमंत्री मुनगंटीवारांची जीभ घसरली, समाजमाध्यमांवर ट्रोल

जोरगेवारांचे कार्यकर्ते मुनगंटीवार यांचा प्रचार करणार

लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवार माझा कसा उपयोग करून घेतात हे आता पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे. यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्तेदेखील मुनगंटीवार यांचा प्रचार करणार आहे, असे जोरगेवार यांनी सांगितले. या मनोमिलनने मुनगंटीवार व जोरगेवार समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.