चंद्रपूर : राज्य विधीमंडळाच्या इतिहासात आणि लोकशाही मूल्यांच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस (४ जुलै २०२५) एक मैलाचा दगड ठरला आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एकाच दिवशी तब्बल ३० अशासकीय विधेयकांची पुनर्स्थापना करून महाराष्ट्राच्या संसदीय इतिहासात अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित केला. ही केवळ एक रेकॉर्डब्रेक कामगिरी नसून जनतेच्या प्रश्नांशी असलेली त्यांची असामान्य तळमळ आणि संवेदनशीलता यांचे प्रतीक असल्याची चर्चा आहे.

आ. मुनगंटीवार म्हणाले, “आजचा दिवस महाराष्ट्राच्या विधिमंडळ कार्यपद्धतीत एक महत्त्वाचा टप्पा ठरतो आहे. याचे मला विशेष समाधान आहे . या अशासकीय विधेयकांच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज मिळेल. ही अशासकीय विधेयके केवळ आकड्यांची मांडणी नाही, तर सामान्य जनतेच्या वास्तविक गरजांवर आधारित आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अध्यक्ष यांनी “स्पिरिट ऑफ लॉ आणि स्पिरीट ऑफ लेटर” या तत्त्वांची आठवण करून देत विधेयक पुनर्स्थापनेला परवानगी दिल्याबद्दल आ. मुनगंटीवार यांनी त्यांचे आभार मानले. “हे विधानभवन ‘लक्षवेधी भवन’ बनत चालले आहे, पण आज तुम्ही अशासकीय विधेयकांसाठी वेळ दिलात, ही लोकशाहीसाठी आश्वासक बाब आहे,” असे सांगत त्यांनी आशा व्यक्त केली. मुनगंटीवार यांनी सादर केलेली विधेयके शेतकरी, विद्यार्थी, महिला, ग्रामविकास, पर्यावरण आणि लोकहिताशी संबंधित असून त्यामध्ये सामाजिक समतोल आणि प्रगतीचा स्पष्ट दृष्टिकोन दिसून येतो. जनतेचे प्रश्न हेच आपल्या राजकारणाचे केंद्रबिंदू असावेत, ही भूमिका सातत्याने निभावणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे हे कृतिशील नेतृत्व विधीमंडळाच्या माध्यमातूनही पुन्हा एकदा अधोरेखित झाले.