यवतमाळ : जिल्ह्यात गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी, पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी ‘ऑपरेशन प्रस्थान’हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत, जिल्ह्यातील २७९ हिस्ट्रीशिटर्सना गुन्हेगारी सोडून सन्मानाने जगण्याची संधी दिली जात आहे. प्रामाणिकपणे काम करू इच्छिणाऱ्यांना रोजगारासाठी मदत केली जाईल, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी गुन्हेगारांना दिला आहे.पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या ‘पोलीस समन्वय’ या संकल्पनेचा भाग म्हणून ‘ऑपरेशन प्रस्थान’ सुरू करण्यात आले आहे. पोलीसांच्या दप्तरी ‘हिस्ट्रीशीटर’ आणि ‘निगराणी बदमाश’म् हणून नोंद असलेल्या, पण अनेक वर्षांपासून कोणताही गुन्हा न केलेल्या व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
यासाठी, पोलिस अधीक्षकांनी सर्व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना एका आठवड्याच्या आत, अशा व्यक्तींची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे मनपरिवर्तन करण्याचे आदेश दिले आहेत. या उपक्रमांतर्गत, गुन्हेगारी सोडून प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा असलेल्यांना रोजगारासाठी मदत केली जाईल. त्यांना ’मी भारताचा नागरिक आहे. मी यापुढे कोणतेही गुन्हेगारी कृत्य करणार नाही आणि अशा कृत्यात सहभागी होणार नाही,’अशी शपथ दिली जात आहे. आतापर्यंत यवतमाळ ग्रामीण उपविभागातील १२ आणि पांढरकवडा उपविभागातील २५, अशा एकूण ३७ जणांनी ही प्रतिज्ञा घेतली आहे. गुन्हेगारांना केवळ शिक्षा न देता, त्यांना सुधारण्याची संधी देऊन सामाजिक सलोखा साधणारे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
जिल्ह्यातील बालगुन्हेगारी, व्यसनाधीनता, अल्पवयीन मुलांमुलींचे हरवल्याचे अधिक प्रमाण यावर उपाययोजना करण्याच्या हेतुने पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून ‘ऑपरेशन प्रस्थान’ या अभिनव उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. ‘ऑपरेशन प्रस्थान’ उपक्रमाचा पहिला टप्पा २१ एप्रील ते २९ मे या कालावधीत एक हजार ८०० मुलींना निवासी शिबीरामध्ये कराटे प्रशिक्षणासह कायदे विषयक, आरोग्य विषयक, कार्यशाळा तसेच करीअर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. ‘ऑपरेशन प्रस्थान’ उपक्रमाचा दुसरा टप्पा ७ जुलैपासून सुरु करण्यात आला. त्यामध्ये एकूण ३० हजार युवक युवतींना प्रशिक्षित करणे हा प्रमुख उद्देश आहे. आतापर्यत एकुण ११ शाळांमध्ये तीन हजार ८०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे.
ऑपरेशन प्रस्थानच्या दोन भागामध्ये पाच हजार ७०० युवतींना कराटे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच ‘ऑपरेशन प्रस्थान’ अंतर्गत तिसरा टप्पा दुर्गम भागातील आदिवासी आश्रम शाळा व उपविभागातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांनीही घेतली आहे.
‘गैरफायदा घ्याल तर कडक कारवाई’
’ज्यांना खरोखर सुधारायचे आहे, त्यांना पोलीस दल पूर्ण मदत करेल. मात्र, जे या संधीचा गैरफायदा घेतील किंवा पुन्हा गुन्हेगारीकडे वळतील, त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली.