नागपूर : धीरेंद्र कृष्ण महाराजांनी जादूटोणा विरोधी कायद्याचे उल्लंघन केले. ते हिंदू लोकांना फसवत असतानाही त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नाहीत. या खात्याचे प्रमुख तुम्ही आहात. त्यामुळे हिंदू लोकांना फसवणाऱ्यांचे समर्थन तुम्ही करणार का, असा थेट सवाल अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. महाराजांवर गुन्हा दाखल न करणे ही ‘आकांची’ इच्छा आहे का, असाही चिमटा त्यांनी फडणवीसांना उद्देशून काढला.

अंनिसच्या वतीने रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात बुधवारी आयोजित पोलखोल सभेत ते बोलत होते. प्रा. मानव म्हणाले, अंनिस ही संघटना कोणत्याही धर्म, देवी-देवतांच्या विरोधात नसून यांच्या नावावर लोकांची फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात आहे. महाराजांनी यु-ट्यूबवर नागपुरात दिव्य दरबारच्या नावावर चलचित्र प्रसारित केले. त्यात ‘भूत बाधा की सवारी आती है, उपद्रव किया गया है, गंदी तांत्रिक क्रिया है’ इतरही बरेच अंधश्रद्धेशी संबंधित वाक्य वापरले.

हेही वाचा >>> नागपूर विधान परिषद निवडणुकीसंदर्भात संभाजी ब्रिगेडचा मोठा निर्णय, कुणाला जाहीर केला पाठिंबा?

भाविकांनी प्रश्न विचारले असता महाराजांनी ‘तुमच्या घरात इलू-इलू सुरू असल्याचे सांगत तुमचेही बाहेर इलू-इलू असल्याचा दावा केला. यातून संबंधित घरात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. प्रश्न विचारणाऱ्यांना जास्त बोलल्यास त इलू-इलू करणाऱ्याचा भ्रमणध्वनी पुढे आणण्याची धमकी देण्यात आली. या गोष्टी जादूटोणा विरोधी कायद्याचे उल्लंघन आहे. सर्व पुराव्यांसह मी स्वत: जादूटोणा विरोधी समितीचे शहरातील प्रमुख पोलीस उपायुक्तांसह पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. परंतु, कुणीही गुन्हा दाखल केला नाही. महाराज पळणार असल्याचे सांगितल्यावरही काहीच झाले नाही.

दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा महाराजांची भेट घेऊन गेले. फडणवीसांकडे गृहमंत्रीपदाचीही जबाबदारी आहे. त्यामुळे निश्चितच ते पोलिसांचे ‘आका’ आहेत. ‘आकां’मुळे महाराजांवर गुन्हा दाखल होत नाही का, हा प्रश्न उपस्थित होणेही स्वभाविक आहे. जादूटोणा विरोधी कायदा तयार करण्यासाठी फडणवीस यांनीही मदत केली आहे. परंतु आता त्यांच्या शहरात या कायद्याची पायामल्ली होत असल्याने फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही प्रा. मानव यांनी केले.

हेही वाचा >>> ‘ते’ करत होते बिबट्याच्या अवयवांची तस्करी, अडकले वनखात्याच्या जाळयात

दिव्यशक्तीचा पंतप्रधानांनाही लाभ होईल

धीरेंद्र कृष्ण महाराजांनी नागपुरातील नियोजित कार्यक्रम दोन दिवस आधीच सोडून पळ काढला. त्यांच्याकडे दिव्यशक्ती असल्यास त्यांनी नागपुरात येऊन सिद्ध करावे. ही शक्ती सिद्ध झाल्यास जगाला त्याचा लाभ होईल आहे. अमेरिकेला ओसामा बिन लादेनचा शोध घेण्यासाठी हजारो कोटी डॉलर्सचा खर्च करावा लागला. महाराजांकडे जर दिव्य शक्ती असेल तर देशात कुठे केव्हा बाॅम्बस्फोट होणार हे आधीच कळून मोठी हानी टळू शकेल. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनाही अशा घटना टाळता येणे शक्य होईल. महाराजांवर नागपुरातच नामुष्की ओढवणार, हेही महाराज आधीच ओळखू शकले नाही, याकडेही प्रा. मानव यांनी लक्ष वेधले.

…तर न्यायालयाचा अपमान

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे जादूटोणा विरोधी कायद्याशी संबंधित एक प्रकरण आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यावेळच्या सामाजिक न्यायमंत्र्यांकडे एक सुरक्षा यंत्राने फायदा होत असल्याच्या जाहिरातीसंबंधित तक्रार आली होती. त्यावर न्यायमूर्तींनी संबंधितांवर तक्रार दाखल करण्याचे आदेश देत पोलिसांना फटकारले होते. या निर्णयानुसार, देवतांच्या नावावर फायद्याचा दावा केल्यास तो गुन्हा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतरही नागपुरात महाराजांवर कारवाई होत नाही. त्यामुळे त्यांच्या गुन्ह्यात सहभागी असल्याच्या नावावर पोलीस अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो. या पद्धतीच्या लोकांवर कारवाई न करणे न्यायालयाचा अवमान असल्याचेही प्रा. मानव यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंनिसच्या विरोधात नारेबाजी

या कार्यक्रमात प्रा. श्याम मानव यांचे भाषण संपल्यावर तिसऱ्या रांगेत बसणाऱ्या काही तरुणांनी अंनिसच्या विरोधात निदर्शने केली. हिंदू बाबांचीच पोलखोल का करतात, हा प्रश्न उपस्थित केला. आंदोलकांनी मंचाजवळ येऊन प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली, जय श्रीरामचे नारे दिले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. परंतु पोलिसांनी आधीच बंदोबस्त वाढवल्याने अनुचित प्रकार टळला.