नागपूर: सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर काल (सोमवारी) सर्वोच्च न्यायालयात एका ७१ वर्षीय वकिलाने बूट फेकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. या प्रकारामुळे देशभरातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नुकताच शताब्दी सोहळा साजरा झाला. यावेळी मार्गदर्शन करताना भागवत यांनी कायदा हातात घेण्यावरून जनतेचे कान टोचले होते. माथेफिरूच्या सांगण्यावरून किंवा कुठल्यातरी दबावाला बळी पडून गुंडगिरी करणे, हिंसाचार करणे, कायदा हातात घेणे या वाईट प्रवृत्ती असल्याचे त्यांनी सांगितले होते. असे असतानाही चार दिवसातच सर्वोच्च न्यायालयात अशी अनुचित घटना घडली.
नेमके काय म्हणाले होते भागवत?
सरकार आणि प्रशासनाचे समाजापासून, समाजाच्या प्रश्नांपासून दुर्लक्ष, कार्यक्षम आणि लोकाभिमुख प्रशासकीय प्रक्रियांचा अभाव ही जनतेचा असंतोष वाढण्याची नैसर्गिक कारणे आहेत. मात्र यासाठी हिंसक आंदोलन हा पर्याय राहू शकत नाही. आपले शेजारी देश सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी जोडलेले आहेत. भारताच्या हितासाठी या देशांमध्ये शांतता, स्थिरता, प्रगती होणे अत्यंत आवश्यक आहे असेही भागवत म्हणाले.
आपला देश विविधतेने नटलेला आहे. गेल्या हजारो वर्षांपासून काही विदेशी संप्रदाय भारताबाहेरील देशांमधून आले. परदेशी लोक आता निघून गेले असले तरी, आपल्या देशातील काही बांधवांनी त्यांचा धर्मा आणि पंथाचा स्वीकार केला. तरीही ते आज भारतात गुण्यागोविंदाने नांदत आहेत. आपल्या देशात विविधता असूनही, आपण सर्व एका मोठ्या समाजाचा भाग आहोत. प्रत्येकाची स्वतःची श्रद्धास्थाने, महापुरुष आणि प्रार्थनास्थळे असतात. विचार, शब्द आणि कृतीतून त्यांचा अनादर होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. त्याकरिता प्रबोधनाची गरज असल्याचे भागवत म्हणाले.
नियमांचे पालन करणे, सुसंवादाने वागणे हा आपला स्वभाव बनला पाहिजे. लहान-मोठ्या बाबींवरून किंवा केवळ संशयावरून कायदा हातात घेणे, गुंडगिरी, हिंसाचार करणे ही चांगली पद्धत नाही. अशा घटना पूर्वकल्पित कल्पनेने किंवा एखाद्या विशिष्ट समुदायाला चिथावणी देण्यासाठी शक्ती प्रदर्शित करण्यासाठी घडवल्या जातात. त्यांच्या जाळ्यात अडकले जाणे तात्काळ आणि दीर्घकालीन ध्येयासाठी हानिकारक आहे. अश्या समज विघातक प्रवृत्तींना आळा घालणे आवश्यक आहे. सरकार आणि प्रशासनाने पक्षपात न करता, दबावाला बळी न पडता नियमांनुसार आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. समाजातील सज्जनशक्ती आणि तरुण पिढीनेदेखील सतर्क, संघटित राहून आवश्यकतेनुसार हस्तक्षेप केला पाहिजे, असे आवाहन भागवत यांनी केले.
सध्या सुरु असलेली युद्धे, इतर लहान मोठे संघर्ष, पर्यावरणीय ऱ्हासामुळे निसर्गाचा होणार कोप, समाज व कुटुंबांचे विघटन, नागरी जीवनात वाढता भ्रष्टाचार, अत्याचार या देखील भयावह गोष्टी आहेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न देखील केले गेले आहेत. परंतु ते त्यांची वाढ थांबवण्यात अथवा संपूर्ण उपाय प्रदान करण्यात अयशस्वी ठरले आहोत अशी चिंता व्यक्त केली.