नागपूर : भाजपचे विधान परिषदेचे सदस्य परिणय फुके यांच्या घरातील वाद पुन्हा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार)  खासदार सुप्रिया सुळे यांनी परिणय फुकेंच्या दिवंगत भावाच्या पत्नीची केस आम्ही ताकदीने लढत असल्याचे आज पत्रकार परिषदेत सांगितले. परिणय फुके यांच्या लहान भावाची पत्नी प्रिया फुकेंविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार झाला आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे नागपूर येथे येऊन गेल्या. आम्ही हे प्रकरण मजबुतीने लढत आहोत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

रमेश फुके आणि त्यांचा आमदार मुलगा परिणय फुके यांनी भाऊ संकेत फुकेला गंभीर आजार असल्याचे लपवून त्याचे प्रियाशी लग्न लावून दिले. संकेतच्या निधनानंतर फुके कुटुंबीयांनी प्रियाला घराबाहेरसुद्धा जाण्यास मनाई केली. त्यांनी प्रियाकडून एटीएम, बँकेचे पासबुक, दागिने जबरदस्तीने काढून घेतले. युनियन बँकेच्या धरमपेठ शाखेच्या खात्यात चार कोटी रुपये होते. मात्र, त्यातील ३.३० कोटी रुपये बनावट स्वाक्षरी करत रमेश फुके यांच्या खात्यात वळते केले, असा आरोप सबाने यांनी केला. याबाबत तक्रार केल्यानंतर “आमचे कुटुंब सधन असून आम्ही राजकीय दबावाने काहीही करू शकतो. तू शांत राहिली नाहीस तर तुझ्या आई आणि बहिणीवर अत्याचार करण्यात येईल,” अशी धमकी सासऱ्यांनी दिली, असा आरोप प्रिया फुके यांचा आहे.

प्रिया फुके यांच्या तक्रारीवरुन डॉ. रमा फुके यांच्या घरातील नोकर चिंटू गजभिये याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामुळे आमदार परिणय फुकेंच्या घरातील कौटुंबिक वाद पोलीस ठाण्यात पोहचला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिणय फुके यांच्या आई डॉ. रमा रमेश फुके (६८, हिलटॉप) यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करताच अंबाझरी पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता प्रिया फुकेंविरोधात गुन्हा दाखल केला.

 प्रिया यांचे लग्न रमा फुके यांचा लहान मुलगा संकेत यांच्याशी २०१२ मध्ये झाले होते. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. संकेत यांचा २०२२ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबात वादाची ठिणगी पडली. प्रिया यांनी घर सोडले. रमा यांना नातवंडांची भेट घ्यायची इच्छा व्हायची, मात्र प्रिया यांनी दर महिन्याला पैसे द्यावे लागतील, अशी मागणी केली. वेळोवेळी प्रियाला पैसे दिले.मात्र, ती कधीही घरी येऊन सामान घेऊन जायची, असा दावा डॉ. रमा यांनी तक्रारीत केला. ६ मे रोजी सायंकाळी प्रियाने विनापरवानगी घरात प्रवेश केला व शिवीगाळ सुरू केली. मला पैसे दिले नाहीत, तर नातवंडांना भेटू देणार नाही. तसेच समाज माध्यमावर तुमची बदनामी करेन, अशी धमकी दिली, असा आरोप करीत डॉ. रमा यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

अंबाझरी पोलिसांनी प्रियाविरोधात लगेच गुन्हा दाखल केला. दरम्यान, काही महिन्यांअगोदर प्रिया यांच्या तक्रारीवरून फुके कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी ‘या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसून मी फक्त समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता.’ असे आ. परिणय फुके यांनी स्पष्ट केले होते. ‘मी वाद शमविण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र त्यात यश आले नव्हते. हा वाद दूर व्हावा अशीच माझी इच्छा होती’ अशी भूमिका त्यांनी मांडली होती. मात्र, आता डॉ. रमा फुके यांनीच सून प्रिया फुकेंविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ६ मे रोजी मी अंबाझरी पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळीविरुद्ध लेखी तक्रार दिली. मात्र, अंबाझरी पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. तक्रार घेण्याची विनंती ठाणेदारांना केल्यानंतरही तक्रार घेण्यात आली नव्हती. तक्रार अर्जसुद्धा घेण्यास नकार देणाऱ्या अंबाझरी पोलिसांनी माझ्याविरुद्ध मात्र सलग दोन गुन्हे दाखल केले. सासरच्या मंडळींनी मला घरी बोलावले होते म्हणून मी गेली होती. मात्र, तेथे गेल्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या उद्देशानेच माझ्याशी अशी वर्तणूक करण्यात आली. चिंटू याला मी कोणत्याही प्रकारची शिवीगाळ केली नाही. उलट तोच मला धक्का देऊन निघून गेला. मला न्यायालयाच्या आदेशाने घरी जाण्याचा हक्क आहे. त्यानुसारच मी दोन्ही मुलांना घेऊन गेली होती. मात्र, माझ्यावर खोटे आरोप लावून गुन्हा दाखल करण्यात आला, असे प्रिया फुके यांनी म्हटले होते.