लोकसत्ता टीम

नागपूर: उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात अल्पावधीतच राज्य केले ते ‘जय’ या नवेगाव-नागझिरा व्याघप्रकल्पातून आलेल्या वाघाने. जेवढ्या लवकर तो प्रसिद्ध झाला तेवढ्याच लवकर तो बेपत्ता झाला. त्याची शिकार झाली, पण खात्याने मात्र अजूनही त्यावर शिक्कामोर्तब केले नाही. आता ‘जय’ची वाघ घेऊ पाहात आहे तो ‘सूर्या’ हा वाघ, पण तो देखील मोठ्या प्रमाणावर जखमी झाला आहे.

‘जय’ प्रमाणेच ‘सूर्या’ने देखील अल्पावधीतच उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात त्याचे साम्राज्य निर्माण केले. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘माया’ या वाघिणीचा तो शावक. गुरुवारी सकाळी पर्यटक सफारी करत असताना ‘सूर्या’ त्यांना लंगडताना दिसला. याच अभयारण्यातील दुसऱ्या वाघाशी त्याची लढाई झाली आणि त्या लढाईत तो जखमी झाला असावा, असा अंदाज आहे. पर्यटकांना तो गंभीररित्या जखमी आढळला. त्याला समोरचा एक पाय जमिनीवर देखील टेकवता येत नव्हता.

आणखी वाचा- Video: काळ्या बिबट्याने केली हरणाची शिकार, मात्र दुसराच बिबट मारतोय शिकारीवर ताव…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वन्यजीव पर्यटक अमित खापरे आणि अभिषेक सिंग यांनी त्याचे छायाचित्र घेतले व चित्रफित देखील तयार केली. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर त्याच्यावरील उपचारासाठी प्रयत्न करावे, असे ते म्हणाले. दरम्यान, वनखात्याने त्या जखमी वाघावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेर ट्रॅप लावले आहेत. वनखात्याची चमू त्यावर लक्ष ठेवून आहे. साधारणपणे जखमी झालेले वाघ त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच बरे होतात. त्यामुळे गरज भासली तरच त्याला उपचारासाठी जेरबंद करण्यात येईल.