लोकसत्ता टीम

बुलढाणा : उशिरा जन्म व मृत्यू नोंद केल्यामुळे प्रमाणपत्र देण्यावर लावण्यात आलेली स्थगिती उठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आता सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. परिणामी ज्यांची जन्म-मृत्यू नोंदणी रद्द झाली आहे, त्यांना सुधारित शासन निर्णयानुसार पुराव्यानिशी संबंधित तहसिलदार यांचेकडे फेरअर्ज सादर करावे लागणार आहे.

उशिरा जन्म व मुत्यू प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. दुसरीकडे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी रान पेटविले होते. याची गंभीर दाखल शासनाने २१ जानेवारी २०२५ नुसार उशिरा जन्म व मृत्यु प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यवाहीस स्थगिती दिली होती. मात्र यामुळे निर्माण झालेली स्थिती आणि नागरिकांच्या अडचणी लक्षात घेत १७ मार्च २०२५ रोजीच्या पत्रानुसार ही स्थगिती मागे घेण्यात आली आहे.

‘ती’ प्रमाणपत्रे रद्द!

दरम्यान ११ ऑगस्ट २०२३ ते २१ जानेवारी २०२५ या कालावधीत निर्गमित झालेली विशिष्ट प्रमाणपत्रे रद्ध करण्यात आली आहे तहसीलदार किंवा तालुका दंडाधिकारी या पदापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी जारी केलेली प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रमाणपत्रे रद्द झालेल्या नागरिकांना सार्वजनिक आरोग्य विभागाचे १२ मार्च २०२५ च्या शासन निर्णयानुसार फेरअर्जासह कागदपत्रे संबंधित तहसीलदारांकडे पुराव्यानिशी सादर करावी लागणार आहे. यासाठी फेर अर्जसोबत निर्धारित पुरावे जोडावे लागणार असल्याचे वरिष्ठ शासकीय सूत्रांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फेरअर्जासाठी आवश्यक पुरावे

फेरअर्जसोबत खालील पुरावे जोडावे लागणार आहे. यामध्ये जन्माचा पुरावा (रुग्णालयाच्या नोंदी किंवा लसीकरणाचे पुरावे), मृत्यू नोंदणीसाठी शव विच्छेदन अहवाल, प्रथम खबरी अहवाल किंवा रुग्णालयीन कागदपत्रे, शैक्षणिक पुरावे (शाळेच्या प्रवेश- टीसी रजिस्टरचा उतारा, बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला). तसेच रहिवासी पुराव्यासाठी मालमत्ता कराची पावती, पाणीपट्टी, वीज बिल, मालमत्ता पुराव्यासाठी सातबारा उतारा, नमुना 8-अ, वारस नोंदीचे फेरफार, मिळकत उतारा, नोंदणीकृत दस्त जोडावे लागतील. ओळख पुरावा साठी वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक, पोस्ट ऑफिस पासबुक जोडावे लागणार आहे.कौटुंबिक पुरावा म्हणून परिवारातील सदस्यांचे जन्म प्रमाणपत्र, शिधापत्रिका, विवाह प्रमाणपत्र इत्यादी पुरावे अर्जासोबत सादर करावे लागणार आहे.