लोकसत्ता टीम
नागपूर: हत्याकांडात दोषी आढळल्यानंतर भंडारा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगाराने संचित रजेवर बाहेर येताच पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन चाकूने प्राणघातक हल्ला केला.
ही खळबळजनक घटना प्रतापनगर पोलीस ठाण्यांतर्गत घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा नोंदवून एकाला अटक केली आहे. हर्षल सुनील सोरदे (२७) रा. भीमटेकडी, आयबीएम रोड असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मुख्य आरोपी सुमित गुलाब पुरी (३५) रा. तुमसर, भंडारा हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सुचिता सुमित पुरी (२७) रा. भाबडे लेआऊट, इंद्रप्रस्थनगर असे जखमी महिलेचे नाव आहे.
आणखी वाचा-अकोला: दोन गटातील वादातून दगडफेक, एकाचा मृत्यू; शहरात जमावबंदी लागू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमितने भंडारा येथे एका युवकाचा भावाच्या मदतीने खून केला होता. २०१५ मध्ये दोघेही भावंडांना हत्याकांडाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याचे सुचिताशी बालपणापासून प्रेमप्रकरण होते. दोघांनी प्रेमविवाह केला. त्यांना चार वर्षांचा मुलगा आहे. सुमित जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी गेल्यानंतर सुचिता नागपुरात राहायला आली. तिने सुरुवातीला एका कॉल सेंटरमध्ये काम केले. त्यानंतर सध्या ती एका मोठ्या सलूनमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी करते.
सुमित तुरुंगातून संचित रजेवर आल्यानंतर नागपुरात तिच्याकडे राहायला येत होता. मात्र, तुरुंगात परत जाण्यापूर्वी तो पत्नी सुचिताच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाणही करीत होता. तिला जिवे मारण्याची धमकी देत होता. तुरुंगातूनही तो तिला धमकीचे पत्र पाठवत होता. त्या पत्रातूनही तो तिला धमकावत होता. गत २७ एप्रिलला तो २१ दिवसांच्या पेरोलवर तुरुंगातून बाहेर आला. नेहमीप्रमाणे तो सुचिताच्या घरी गेला. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण केले.
आणखी वाचा- गोळी झाडून दहशत माजविणाऱ्या आरोपीचा शोध न लावल्यास जिल्ह्यात आंदोलन करू- आ. विजय वडेट्टीवार
शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सुचिता त्रिमूर्तीनगर येथील तिच्या सलूनमध्ये जाण्याच्या तयारीत असताना सुमित हा मित्र हर्षलसोबत तिच्या घरी आला. कोणत्यातरी युवकाशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करून चारित्र्यावर संशय घेऊन सुचिताशी वाद घातला. सुचितानेही त्याला प्रतिउत्तर दिले. वाद चिघळत गेला. संतापलेल्या सुमितने चाकू काढून सुचितावर हल्ला केला. हात, पाठ आणि पोटावर मारून गंभीर जखमी केले आणि फरार झाला. घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलीस घटनास्थळावर पोहोचले. सुचिताला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून हर्षलला अटक केली. न्यायालयातून त्याची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे. सुमितचा शोध सुरू आहे.
