scorecardresearch

चंद्रपूर : विद्युत प्रवाहाचा स्पर्श की शिकार? नांदगाव येथे वाघाचा संशयास्पद मृत्यू

नांदगाव येथे एका शेतात पूर्ण वाढ झालेल्या वाघाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत मिळाल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे.

death tiger Nandgaon
नांदगाव येथे वाघाचा संशयास्पद मृत्यू ( छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मुल तालुक्यातील नांदगाव येथे एका शेतात पूर्ण वाढ झालेल्या वाघाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत मिळाल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे. जिवंत विद्युत प्रवाहाचा स्पर्शाने मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, वाघाचे मृतदेह शेतात तणसाच्या खाली लपवून ठेवण्यात आला होता. दरम्यान, जिवंत विद्युत प्रवाह सोडून वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटना या जिल्ह्यात वाढल्या आहेत.

आज सोमवार ६ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. नांदगाव येथील पुनाजी नागमकार यांच्या शेतात ही घटना घडली आहे. मृत्यू कशामुळे झाला हे वन खात्याने जाहीर केलेले नाही. वनपरिक्षेत्राधिकारी फनींद्र गादेवार हे घटनास्थळावर उपस्थित झाले असून पंचनामा करण्यात येत आहे. वाघाचा मृत्यू जिवंत तारांचा स्पर्श झाल्याने झाला, अशी चर्चा आहे. या घटनेची माहिती मिळताच लोकांची गर्दी जमली आहे. या घटनेमुळे पुन्हा एक वाघ परिसरातून कमी झाला आहे.

हेही वाचा – नागपूर : अतुल लोंंढे यांचे उद्या अर्थसंकल्पावर व्याख्यान

हेही वाचा – अकोला : ‘अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी करा’, ‘एसबीआय’पुढे काँग्रेसचे धरणे

दरम्यान शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे वन विभागचे अधिकारी सांगत आहेत. वाघाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह तणसाच्या खाली लपवून ठेवण्यात आला होता. त्यामुळे, वाघाचा जिवंत विद्युत प्रवाहाचा स्पर्शाने मृत्यू झाला व ही बाब लपवून ठेवण्यासाठी असा प्रकार केला गेला, असे सांगितले जात आहे. या प्रकरणात वन खाते चौकशी करत आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 16:51 IST